तू गेल्यावर पसारा आठवांचा घरभर
अन डोळ्यांच्या काठांतून पागोळ्या झरझर
देह तुझ्या असण्याने होता दरवळलेला
गेल्यावरही मागे उरला सुगंध मनभर
उर्मी फुलण्याची आताशा मिटू लागली
उमलत आहे आस मृत्यूची हळूच नवथर
रुतणे इतक्या वेगाने येऊन जिव्हारी
चुकवायाचा काळजास ना होता अवसर
एक व्हायची आशा ना उरली किंचितही
दूर राहूनी प्रेम तरी जगवूच निरंतर
गेल्या जन्मीचे अजून कां देणे थकले ?
मोकळेच कर चार ओढुनी कोडे भरभर