..............................................
...पिंपळाचे पान !..............................................
तो सुगंधी मोकळ्या केसांतला अंधार...!
ओठओले स्पष्ट अन् अस्पष्टसे हुंकार...!
आतला, देहातला तो हावरा शृंगार...!तापल्या देहातले ते तापलेले श्वास...!
श्वास की, बेभानलेल्या वादळाचे भास...?
-की असे तो दोन देहांच्या विजांचा रास...?दोन हातांनी किती झेलायची बरसात...?
दोन चंद्रांचे न मावे चांदणे पदरात...!
लाख रातींतून एखादी अशी ही रात...!स्पर्श स्पर्शांतून...स्पर्शांतून पेटे वीज...!
जाग ये तृप्तीस...! अतृप्तीस नाही नीज...!
क्लांत झाले देह...नाही क्लांत हे काळीज...!* * *
रात संपे...अन् पहाटेला हळू ये जाग...!
धुगधुगे गात्रांत साऱ्या मधुर, हळवी आग...!
माग जे मागायचे ते आणखी तू माग...!तृप्त हा...अतृप्ततेचा सोहळा बेभान...!
घेतलेही अन् दिलेही एकमेकां दान...!
अन् दवाने चिंब न्हाले पिंपळाचे पान...!!- प्रदीप कुलकर्णी
..............................................
रचनाकाल ः १९ जानेवारी २००५
..............................................