वसंत आणि निसर्ग

'वसंत' ह्या विषयावर अनेक कविता झाल्या असतील आणि होतीलही. पण हा ऋतूच असा आहे की लाखो कवितादेखील त्याचे वर्णन करायला अपुऱ्या पडतील.

येइल येइल वसंत अन् पारिजात फुलेल दारी
नटेल सजेल होइल धरणी गोडगोजिरी सारी
पुन्हा एकदा भूमाता ही भरेल हिरवा चुडा
सुटत्या सरत्या शिशिराचा या रंग प्राशुया थोडा
पुन्हा एकदा निसर्गगाणे गाइल हा कोकिळ
मोहोराचा हा गरोदरपणा आंबा पण सोशील
थरथरतिल ते हरिणाचे पद सबंध रानोमाळी
पशुपक्षीही हर्षित होतिल रात्र ही सरलि हिवाळी
वसंताची ही ऊब लाभता आठवते माउली
माया ममता प्रेम तृप्तिच्या पंखाची साउली
सरेल संध्या येइल रजनी फुलेल रातराणी
पृथ्वीच्या या मांडीवरती निजतिल पक्षी प्राणी
झोपवतिल मज थोपथोपटुनी आकाशातिल तारे
माझ्याकरिता अंगाई पण गातिल मिळून सारे
प्रश्न पडे परि स्वप्न असे की खरेच होइल सारे?
निसर्गातला देव पूजिता नक्कीच होइल सारे!
आला वसंत प्रेम पाहाया या धरणी गगनाचे
त्याला पाहून मन हे माझे काळविटासम नाचे
आला आला वसंत पारिजात फुलला दारी
नटली सजली झाली साजिरी धरा सारी...