अंतर

घुसमटलेले क्षण, आणि
           गुदमरलेले दिवस
दाटलेली कुंद हवा, अन
           सरपटणारे आयुष्य

प्रकाशाचा एक कवडसा
घुटमळतो आहे कधीचा बाहेर
छताला लटकलेली जळमटे
थरथरताहेत वाऱ्याच्या झोताबरोबर

बाहेर झगझगीत प्रकाश
          आणि आत मिट्ट काळोख
बाहेर घोंघावणारा वारा
           अन आत श्वासासाठी कसावीस मन

दाराची बंद कडी,
करकरते आहे क्षणोक्षणी
सोनेरी पिवळे फुलपाखरू,
गरगरते आहे बंद खिडकीभोवती

माहीत आहे मला, की
उघडेल कधी हे दार
आणि खिडकीची तावदाने,
संपवतील सगळा विरोध

मग पसरेल घरभर साऱ्या
शुभ्र तेजस्वी प्रकाश,
आणि दरवळेल धुंद सुगंध,
झुळझुळणाऱ्या वाऱ्या सोबत

वाट पाहते मी
त्या एका क्षणाची
जेव्हा नसेल काही अंतर
एकरूप असतील, सारे जीव
आणि पंचमहाभूते
नसेल काही आतले
आणि काही बाहेरचे
या धरतीवर
'मी' पण होईल साऱ्यांचे
एक अनादी, निरंतर