'पहिली कमाई'
अजूनही स्पष्ट आठवतात ते दिवस. नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती अन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मी सुट्टीत पुढची स्पप्ने रंगवत होतो. चांगले गुण पडले की संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा ते. त्यावेळेस (१९९७) मधे संगणकामुळे होणाऱ्या प्रगतीमुळे सवजण भारावूण जात होते. मीही त्यातून सुटलो नाही. मला लहानपणापासूनच संगणकाबद्दल प्रचंड जिज्ञासा होती. त्यातच मला एका प्राथमिक संगणकाच्या अभ्यासक्रमाबद्दल 'सकाळ'मधे जाहिरात पाहायला मिळाली. मी ती जहिरात पाहताच हा अभ्यासक्रम या सुट्टीत पूण करायचा असे ठरविले. पण मुख्य अडचण होती ती म्हणजे फीची. त्यावेळेस संगणक अभ्यासक्रमाची फी जास्त वाटत होती. त्यातून मध्यमवर्गातील असल्याने बाबांवरती या फीचा बोजा टाकणे बरोबर वाटेना. वाटायचे माझ्या आवडीसाठी त्यांना कशाला वेठीस धरायचे. पण माझे मन मला स्वस्थ बसू देईना. मग खूप विचारांती एकच उपाय सापडला - की हे पैसे स्वतः कमावायचे नि संगणक अभ्यासक्रम पूर्ण करायचा. कारण मी असे एकले होते की परदेशात शालेय विद्यार्थी, कालेजकुमार सुट्टीत तात्पुरते काम करून आपला वरखर्च भागवतात. आता अडचण होती ती - तात्पुरत्या नोकरीची !
पण 'इच्छा तेथे मार्ग' म्हणतात तसे झाले. माझा शालेय मित्र रमेश नेमका त्याच वेळी भेटला. त्याच्याशी गप्पा मारताना असे कळाले की तो सध्या एका मार्केटिंग कंपनीमध्ये कामाला आहे आणि तिथे आपण जितकी मेहनत घेऊ तितके पैसे मिळतात. त्याचे बरेचसे मित्रही तिकडे कामाला होते नि आता कंपनीला आणखीन काही मुलांची गरज भासत होती. मग काय विचारता मी दुसऱ्याच दिवशी तिथे हजर झालो. हो! तो एक घरोघरी, दारोदारी हिंडणाऱ्या व मार्केटिंग करणाऱ्या सेल्समनची नोकरी होती. पहिल्यांदा फार विचित्र वाटले. माझ्या काही वाईट समजुती होत्या सेल्समन च्या बाबतीत इतरांप्रमाणे. पण असाही विचार आला की दुसरीकडे कोण नोकरी देणार आणि तीही तात्पुरती. पैसेही पुरेसे मिळणार होते. मग जास्त विचार न करता झोकून दिले.
पहिल्या दिवशी त्यांनी एका अनुभवी सेल्सगर्ल बरोबर मला प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवले. पहिले दोन दिवस मी त्यांचे अन ते माझे निरिक्षण करायचे आणि त्यावर आधारित मुलाखत घ्यायचे ठरवले. तो त्यांच्या प्रशिक्षणाचाच एक भाग होता. जर मी ती मुलाखत पास झालो तरच ते मला कामावर घेणार होते. मासिक पगार फारच किरकोळ होता. खरी कमाई होती ती कमिशन मधे. म्हणजे जेवढ्या जास्त वस्तू तुम्ही विकण्यात यशस्वी व्हाल तेवढे जास्त कमावालं. प्रत्येक वस्तूवर १५% कमिशन मिळणार होते. वस्तू म्हणजे वेगवेगळ्या, प्लास्टिकच्या, घरगुती किंवा कामाच्या इथे लागणाऱ्या होत्या. त्यात कात्र्यांपासून थर्मास फ्लास्क - ३० रु. ते १२० रु. पर्यंतच्या होत्या. तुम्ही जर सलग तीन दिवस ९०% पेक्षा जास्त विक्री करून दाखवलीत तर तुम्हाला प्रमोशन मिळणार आणि कमिशनही वाढणार होते. पहिल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर माझी मुलखत घेण्यात आली आणि मला ही नोकरी मिळाली. आता खरी गंमत सुरू होणार होती ती म्हणजे स्वतः वस्तू घेऊन विकण्याची आणि तीही अनोळखी लोकांना. अर्थात त्यासाठी काही मार्केटिंगची तंत्रेही मदतीला असतात. त्यापैकी एक म्हणजे एका वर एक वस्तू मोफत देण्याची आणि बरेचसे लोक मोफत म्हटले की हमखास बळी पडतात. खरे म्हणजे दोन वस्तुंची एकत्रित किंमत सांगून एकावर एक मोफत विकणे ! दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण ! माझ्या पहिल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षणामधे असे बिंबवण्यात आले की तुम्ही वस्तू विकत नसून तुमचे व्यक्तिमत्व विकता. त्यांची शिकवलेली अशाप्रकारची तंत्रे आणि ४-५ किलोच्या वस्तूंनी भरलेल्या दोन पिशव्या घेऊन एकटाच बाहेर पडलो.
बाप रे! पहिल्या दिवसाचा अनुभव फारच भयंकर होता. त्या जड पिशव्या घेऊन लोकांच्या दारोदारी हिंडायचे. प्रथम तर रखवालदार आत मधे सोडायचे नाहीत आणि लोकांच्या घरापर्यंत पोहचले तर तोंड उघडायच्या आतच लोक धाडदिशी दरवाजा लावून घ्यायचे जणू मी काही त्यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलो आहे. जरा पाणी मागितले तरी तोच प्रतिसाद. मग मी ताबडतोब निर्णय घेतला आणि घरांएवजी दुकाने आणि ऑफिसाकडे मोर्चा वळिवला. जेवढा लोकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत गेला तेवढीच माझी जिद्द वाढत गेली. माझा निर्णय योग्य ठरला. माझे संभाषण चातुर्य, मार्केटिंग तंत्रे आणि मेहनतीला फळे येऊ लागली. जसजशा वस्तू खपत गेल्या, तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. माझी जिद्द इतकी वाढली की मी दुपारी जेवायचे देखील विसरलो. मी सकाळच्या नाश्त्यानंतर काहीच खाल्ले नव्हते ते ऑफिस मधे परतेपर्यंत. माझ्या पहिल्या दिवसामधे मी बऱ्यापैकी वस्तू विकू शकलो. मला पहिल्यादिवसाचे कमिशन म्हणून २५० रु. मिळाले. माझ्या आनंअदल पारावर उरला नाही. स्वकष्टाचे ते पैसे घेताना, माझे हात थरथरत होते. डोळ्यातून आनंदाश्रू गळाले. ते माझ्या दिवसभर उन्हातान्हात गाळलेल्या घामाचे पैसे होते. माझा विश्वास बसत नव्हता आपण स्वतः एवढे कमावू शकतो ते.
पैसे मिळताच कधी एकदा घर गाठतोय असे झाले. कधी एकदा आईला स्वतः कमावलेले पैसे दखवतोय असे झाले. मी जवळजवळ उडतच घर गाठले. घरी आई-बाबांना खुप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातले कौतुक मी वाचू शकत होतो. आईने ते पैसे प्रथम देवाजवळ ठेवण्यास सांगितले आणि नमस्कार करून देवाकडून आशीर्वाद घेण्यास सांगितले. मी मनोमन देवाला अशी प्रार्थना केली की तू अशीच साथ देत रहा, माझी मेहनत घ्यायची पूर्ण तयारी आहे. देवाने खरच माझी प्रार्थना एइकलेली दिसते. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. मी त्या कंपनीमध्ये पुढील दोन दिवसात विक्रीचे उच्चांक गाठले. तेवढीच माझी जिद्द वाढली. एके दिवशी तर मी ज्या सेल्सगर्लने मला प्रशिक्षण दिले तिच्या पेक्षा जास्त विक्री करून दाखवली. आठवड्याभरातच मला प्रमोशन ची संधी चालून आली. मला आणखीन एक दिवस ९०% पेक्षा जास्त कमाई करून दाखवायची होती. ती झाली की मी ही अनुभवी सेल्समन होणार होतो. पण तो पर्यंत त्या आठवड्यातच माझ्याकडे संगणक अभ्यासक्रमासाठी लागणारी रक्कम जमा झाली होती. मग मी आणखीन पैसे कमावायच्या मोहाला बळी न पडता, नोकरी ताबडतोब सोडली. कंपनीच्या मनेजरने खुप विनंत्या केल्या पण मुळ उद्देशापासून हटलो नाही. पुढे तो संगणक अभ्यासक्रम पुर्ण केला. देवाच्या क्रुपेने चांगले गुण पडून अभियांत्रिकीला प्रवेश घेतला.
सध्या मी जर्मनीमधे रोबोटिक्स इंजिनिअर म्हणूण 'पहिल्या कमाई'च्या कितीतरी पट कमावत असलो तरी पहिल्या कमाईचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. त्या कमाईने मला मेहनत घ्यायची जिद्द दिली, आत्मविश्वास दिला. ती माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. कधीही न संपणारी. तिला मी कसा विसरेन!
संदीप खोत (sandeepbkhot?yahoo.com)