उत्तराची अत्तरे !

उत्तराची अत्तरे प्रश्ना तुला लावेन मी!

मी कसा आहे शहाणा हे तुला दावेन मी॥१॥

भांडती माझ्यासवे सारे तुझे जे सोबती

हट्ट त्यांचे भांडण्याचे सर्वही पुरवेन मी॥२॥

मानू नये दुबळा परंतू त्या कुणीही रे मला

गैरसमजाच्या चुकीला, चांगला भोवेन मी॥३॥

वाहतो आहे तुझे ओझे शिरावर आज जे

त्याच ओझ्याला उद्या आनंदुनी मिरवेन मी॥४॥

तूच माझा सोबती सौख्यातही, दुःखातही

हाक दे अडल्या घडीला, झडकरी धावेन मी॥५॥

पाहतो मी नेहमी ही शक्यता पडताळुनी

थोडी तरी जागा तुला डोक्यात या ठेवेन मी॥६॥

''कोण मी? '' हे रूप मजला आवडे मित्रा तुझे

''अत्तराचा थेंब रे'' या उत्तरी मावेन मी॥७॥