राजकन्या सॅली

   सॅली. 

सॅली हे नाव तिला कसं पडलं, हे कोणालाच माहीत नाही. तिच्या फुलांच्या मांडणीत सायलीची फुलं सर्वात जास्त, म्हणूनच असेल  कदाचित.
     पहिल्या प्रहराला, पोस्ट ओफिस जवळच्या रस्त्यावरून निघालं की पुढच्याच वळणावर सॅली आपल्या फुलांचा संसार थाटात मांडायची. फुलं दिसण्याआधीच, वळणावर त्यांचा सुगंध येणाऱ्याचं स्वागत करायचा.
    बारा वर्षांची इवलीशी सॅली स्वतःभोवती फुलं पसरून, त्यांच्या मधोमध बसायची, फुलासारखीच. तिला तिच्या फुलांबरोबर बघितल्यावरच पहाट खुलल्याचं समाधान मिळायचं. गावातल्या सगळ्यांच्या घरी फक्त सॅलीकडचीच फुलं दिसणार. सकाळी सगळ्या ताया आणि संध्याकाळी सगळे दादा तिच्याकडूनच फुलं आणि गजरा घ्यायचे.

    सॅली मुळात दार्जिलींगची. आपल्या मावशी बरोबर ह्या गावात आलेली. दार्जिलींग सुटलं पण फुलांचं वेड काही सुटलं नाही. तसं पण त्या कोवळ्या हातात कोणी खरकटी भांडी दिली नसती.. मावशी गेली पण आता हे गावच तिचं घर झालं होतं.
  मी तिला एक फुलांचं पुस्तक घेऊन दिलं होतं. तिनं त्या फुलांच्या वेगवेगळ्या जाती आणि प्रकार यांवर एक तास मला लेक्च्यर दिलं. तरीही तिला झालेला आनंद मला दिसत होता. कोणीतरी भेट दिल्याचा, की जुने मित्र भेटल्याचा? मी नाही विचारलं तिला. भेटीची परतफेड म्हणून असेल किंवा आनंदाच्या भरात म्हणून, तिनं मला तिची सर्वात जिव्हाळ्याची जागा दाखवली. गावाबाहेरच्या दलदलीत फुलझाडांची गर्दी झाली होती. 
सॅलीला ह्या दलदलींतून उगवणाऱ्या फुलांचं आकर्षण वाटणं स्वाभाविकच होतं.

   सॅली एकदा मला म्हणाली, "तूम्ही का नाही घेत कधीच फुलं"?
"मी फुलं घेऊन करू काय? 'माझं' असं कोणीच नाही आहे फुलं द्यायला". 
"आपलस करायलाच तर फुलं द्यायची असतात". मी पुन्हा निरुत्तर.
मग तिनं मला सायलीची फुलं दिली, म्हणाली "ही फुलं वरच्या खिशात ठेवा मग दिवसभर फक्त सायलीचाच वास." मग मिही असा कायमचा सायलीमय झालो.

पण मग एक दिवस आला आणि सगळंच बदलून गेलं      

आमच्या गावालाही शहरीकरणाचं वारं लागलं होतं. नवीन घर बांधायच्या जमिनीसाठी, फुलांच्या दलदलीनी स्वतःचा बळी दिला होता. 'सॅलीची उद्या समजूत काढू', असं स्वतःला समजवत मी तिला भेटणं टाळलं.

     पण सॅली नंतर मला कधीच दिसली नाही. पोस्ट ओफिस समोरचा रस्ता 'पोस्ट ओफिस रोड' म्हटला जाऊ लागला.

खिशातल्या सुकलेल्या फुलांचा वास येणं देखील थांबलं होतं. खूप ठिकाणी चौकशी करून सुद्धा काहीच समजलं नाही. मी एका फूलवेडीसाठी एव्हडं अस्वस्थ का व्हावं हे लोकांना कळत नव्हतं.

  

     बऱ्याच दिवसांनंतर सॅली बद्दल समजलं आणि मनावरचं ओझं दूर झालं.

         गेली होती फूलांची राजकन्या, फूलांच्या देशा.......