अनमोल भेट

जवळ जवळ पंधरा वर्ष जुना प्रसंग, पण माझ्या आजही आठवणीत आहे
दिवाळी जवळ आली होती. घरोघरी सजावट केल्या गेली होती. फराळाचा घमघमाट वातावरणात तरतरी आणत होता. फटाक्यांची दुकाने बालगोपालांच्या ताब्यात दिसत होती. माझीही तयारी जोरात चालली होतीच!
कोणता ड्रेस घ्यायचा, कोणते दागिने घालायचे, सगळं आधीच ठरलेलं! आता बाकी होतं ते कॉस्मेटिक्स आदी ची खरेदी... तशी मी फार "मटकी" नव्हते, पण आईच्या भाषेत सांगायचं झालं तर "नाटकी" होते फार... त्यामुळे आई माझ्याबरोबर खरेदीला यायला जरा का.. कू.. करत होती.... तीला तिचे कामं सोडून माझ्याबरोबर उगाच दुकानं हिंडण हा "टाईम पास" परवडणारा नव्हता... पर्यायी उरलेली खरेदी मला एकटीलाच करायची होती..

मी खरेदीला गेले खरे; पण दुकानातली प्रचंड गर्दी पाहून आत जायची इच्छा होईना. तेंव्हा फटाक्यांच्या दुकानात फेरफटका मारला. लहान भावासाठी फटाके घेतले, आणि बाहेर पडले. गाडीजवळ एक चिमुकला माझ्याकडे बघत उभा होता
काटकुळी अंगकाठी, जुने कपडे, बोलके डोळे काळवंडलेला चेहरा, आसा हा पाच सहा वर्षाचा मुलगा एकदा माझ्याकडे आणि एकदा माझ्या हातातल्या फटाक्याच्या बॅग कडे पाहत होता. त्याच्या चेह-यावर फटके उडवण्याची तीव्र इच्छा दिसत होती. त्याचे बोलके डोळे त्याच्या आर्थिक परिस्थितिचे वर्णन करत होते. फटक्यांची किमंत त्याच्य परिस्थितिला परवडणारी नक्कीच नव्हती.
मी माझ्या हातातली फटाक्यांची बॅग त्याला दिली, आणि त्याच्या चेह-यावरचे भाव वाचू लागली. माझ्या हातातली बॅग घेऊन तो उत्सुकतेने फटाके बाहेर काढू लागला. त्याच्या चेहे-यावर उमलणारं हसू, डोळ्यातले आश्चर्य, त्याच्या मनातला आनंद बघताना मी मलाच हरवून बसले.
फटाके जमिनिवर अस्ताव्यस्त पसरवून तो मिनिटभर काय उचलू यातच रमून गेला... लगेच त्यातली चार पाच टिकल्यांची पाकिटं भरा भरा उघडून घेऊन तो ती टिकल्यांची बाजूलाच पडलेल्या दगडाने फोडू लागला... अव्यक्त इच्छा अनपेक्षित पणे पूर्ण झाल्यावरचे त्याचे हाव भाव मला कळत होते. समाधान झाल्यावर उरलेले फटाके घरी नेण्यासाठी तो एकत्र करू लागला.
"काय रे बाळ? काय नाव तुझं? ".. मी विचारलं. "श्श्याम".. " कुठे राहतोस तू? "... "मरारटोळी.... माझा बापू रिक्षा चालवतो, सवारी होती म्हणून मला बसवल इथे" तो सांगत होता.... "भुक लागली असेल न रे तुला? " मी विचारलं... "चल आपण समोसे खाऊ! ".. समोस्याचं नाव ऐकताच त्याची भूक बळावली असणार! तो तयार झाला.. लक्ष्मी भुवन चौकातल्या नेहमीच्या समोसेवाल्याकडे मी त्याला घेऊन गेले, त्याल दोन प्लेट समोसे घेऊन दिले, त्यातला एकच समोसा त्यानी खाल्ला, आणि बकिचे कगदात बांधून घेतले.. "काय रे, खा नं" मी म्हणाले.. " माझ्या बहीणीसाठी नेतो घरी" तो उत्तरला...
त्याला पुन्ह त्याच्या जागेवर बसवून मी घरी निघाले, घरी आल्यावर आईला त्याच्याबद्दल सांगितलं.. आईनी लगेच फराळाचं बांधून दिलं. मी फराळाची पिशवी घेऊन पुन्हा तिथे आले.. पण तो तिथे नव्हताच! मला घरून जाऊन यायला पंधरा विस मिनिटं लागली असावी, तेव्हढ्या वेळात त्याचे वडील त्याला घेऊन गेलेतही.. त्यानंतर कितितरी दिवस माझी नजर त्या समोशाच्या दुकानाकडे भिरभिरत राहीली, पण शाम मला पुन्हा भेटलाच नाही. कदाचित तो आज समोर आला तर मी त्याला ओळखू देखिल शकणार नाही तरीही.... त्यानंतर आजपर्यंतची प्रत्येक दिवाळी मला आठवणीत घेऊन जाते. या घटनेला आज पंधरा वर्ष होत आलीत, पण मी शाम ला विसरूच शकले नाही.. अर्थात त्याला कारणही तसच आहे...
मी शामला पाच पन्नस रुपयांचे फटाके दिले असतील, त्यानी ते एक झटक्यात उड्वून संपवले ही असतील, ते थोडेसे समोसे देखील तासाभरात संपले असतील, मात्र शामनी मला जन्मभर पुरेल अशी भेट दिली. त्याच्या चेह-यावरचा निरागस आनंद, तो आनंद टिपून घेण्याची मला मिळालेली संधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं असं, मला मिळालेलं समाधान, जे आजन्म माझ्याजवळ राहणार आहे, यापेक्षा अनमोल भेट अजून कोणती असू शकते