होता वसंत तेव्हा, आता वसंत आहे
नाहीस तू समोर, इतुकीच खंत आहे ॥
भेटीत सांजवेळी मिळुनी म्हणायचो, ते
गाणे उरात माझ्या अजुनी जिवंत आहे ॥
हातात हात होते, डोळ्यांत फक्त डोळे...
त्या आठवांस आता, बुजणे पसंत आहे ॥
होतेच मार्दवाचे झडले सडे कितीक,
मातीस वास येण्या, आता उसंत आहे?
होती अबोलता? की मौनात बोलणे ते?
ती शांतता तशीही आता ज्वलंत आहे ॥
सांगू किती किती मी गोष्टी वसंतवेड्या?
माझ्या सुरांत त्याचे ओझे अनंत आहे ॥