हिला गझल म्हणता येईल का?? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा.
अंगणात पारिजात, खुष त्यात सत्यभामा
सवतीच्या घरी सडा, अजुनी पडे रे श्यामा
हे भाग्य द्रौपदीचे, फिरुनी पणास लागे
कौरव पांडवाचा, झाला करारनामा
भवती किती शिखंडी, ठाकती उभे समोर
ठेवुनी शस्त्रे खाली, येतात भीष्म कामा
दुर्योधनाच्या करी, कर्णाचे बाहुले जे
नाचे हवे तसे ते, सलाम करुनी दामा
रिती, नीती, अनिती, सांगे कथाच कुंती
गांधारी ती अबोल, शोधी नव्या विरामा
सगळे पडे न दृष्टी, आज या संजयाच्या
धृतराष्ट्राच्या कुशीत, बसला शकुनीमामा
झिडकारीले त्वरित, ते थेंब अमृताचे
मंजुर नव्हते जगणे, होऊन अश्वथामा
पोटावरीच लाथा, सोसून क्षिणला पार
हाती धरून पोहे, फासावरी सुदामा
अज्ञातवासी झाला, अनुजांसहीत धर्म
शतकांती शिशुपाला, आवर त्या घनश्यामा
सांगून व्यास गेले, महाभारतात सत्य
हव्यास पुन्हा पुन्हा तो, बदलून येई नामा