हे दिवस पावसाचे, जरा जपून
आवडत्या धोक्यांचे, जरा जपून
या सुसाटत्या वारी
तोल सावर उतारी
पदर ओला लपटून, जरा जपून
एक छत्री, दोघेजण
बिलगण्या पुरे कारण
नखशिखांत चिंब भिजून, जरा जपून
असे सोबतीस कुणी
आधार दे जो झणी
जा, खुशाल जा घसरून, जरा जपून
पागोळ्यात धर हात
मार लाथा पाण्यात
बघ, सान पुन्हा होऊन, जरा जपून
महफिलीत मित्रांच्या
रम फडी आठवांच्या
सप्तकी पार गाऊन, जरा जपून
वाफाळत्या चहाचा
वा प्याला मदिरेचा
घे किक जरा लावून, जरा जपून
खिडक्या खोल साऱ्या
फुटू दे नव्या धुमाऱ्या
दे, स्वतःस दे झोकून, जरा जपून
सागराच्या किनारी
कर लाटांवर स्वारी
चल, जगास घे जिंकून, जरा जपून