ओथंबलेले... साजिरे.. सावळे
आज अंबरात, चित्र हे आगळे
स्तब्ध स्तब्ध का घन जाहले?
बरसण्याचे का भान नुरले?
नभाची निळाई, दिसे ना जराही
शालू अंधाराचा, नेसली धराही
अजब हुरहुर
कातळ आतुर
लोचनांना का वेध लागले?
लागते चाहुल, वाजे न पाऊल
वाऱ्यात शहारे, मनाला कबुल
जाणिवा अधीर
जाणिवा बधीर
भावनांनी का हात गुंफले?
अनंत या स्मृती, संधी साधती
एकल्याच जीवा, त्या कवटाळीती
अंतरात पिंगा
अंतरात दंगा
पापण्यातुनी का दवं साचले?