आई

ऐक सखे ऐक सखे
सय आली आईची.

काया      तिची जाईची
माया तिची सायीची
भुई माझ्या पायीची
ती छाया माझ्या डोईची
पहाडाला भिडुनी गं
पूड काढी राईची
बोलते गं वाणी अश्शी
लाज काढी शाईची
आहे ती गं आहे ती गं
अधिकाच्या असोशीची
नव्हतीच नसेल ती
नकाराची नाहीची

देह आता सुकतो गं
पाठीमध्ये वाकतो

नाही कधी बहरली
नाही कधी सजली
पान नाही फूल नाही
मुळावाणी रुजली

उन्हामध्ये रापली ती
मातीमध्ये खपली
मुळांची माती अशी
घामाने धुपली

बहरले झाड असे
बहरही झाकेना
माती तरी लोटायाला
जाड खोड झुकेना.