एका घरातली बाळे..

एका घरातली बाळे..

.

करंगळी, मरंगळी..
मधले बोट..
चाफेकळी, अंगठा.
एका घराततली बाळे..

अंगठोबा आगळे वेगळे..
साऱ्यांत असून राहती.. वेगळे
असो काम लहान मोठे,
अंगठोबांची वर्णी लागे..

चाफेकळीची तऱ्हाच न्यारी..
पुढे पुढे असते स्वारी..
उत्साही, मनमेळाऊ..
लळा लावते कुणासही..

उंच देखणे सगळ्यांतले,
राजबिंडे बोट मधले..
अदब आपली राखून राहते..
कधी कधीच वाकती राजे..

मरंगळी मरगळलेली..
राहते मागे मागे..
बनून शेपूट येते जाते..
ध्यान उलटे चाफेकळीचे..

असून नसते कधीच कुठे..
अनामीकाही हरवून जाते..
पाचांमधले पोर बावळे..
दूर दूरच त्या ठेवती सारे..

कुणी छोटे कुणी मोठे..
कोण बळकट कोण दुबळे..
कुणी शहाणे कुणी बावळे..
कोण जवळ कोण दूर जरासे..

एका घरातली बाळे;
कुणी लाडके कुणी दोडके..
एका हातचे खाती निवाळे..
मायेने वा रागे रागे..

====================
स्वती फडणीस.......... ०९-०९-२००८