( मध्यवर्ती कल्पना : An elegy of a mad dog या इंग्रजी कवितेवर आधारित )
गाव होतं तसं, छोटं पण समाधानी
होते काही त्यातही, धनी आणि मानी ।
खबर गावाची सारी, येई यांच्या कानी
लोकांचेच भले सदा, असे ध्यानी-मनी ।
महंत एक त्यातही, मानाचा तो मानकरी
डंका गाजे कर्तुत्वाचा, पूजनीय असे जनी ।
शीलवंत तो श्रीरामासम, निष्ठेचा देवव्रत भासे
शौर्याचा पार्थ जणु, औदार्याचा कर्ण दिसे ।
जमती जन सभोती, ऐकण्यास अमृतबोल
एक एक शब्दाला, येई पृथ्वीचे मोल ।
त्याच गावी असे एकटे, अनाथ श्वान वाटेवरले
शोधितसे अन्न-पाणी, उच्छिष्टांवरती ते जगले ।
न त्याला चिंता कसली, न द्वेष अन वैर कुणाशी
सुखे नांदे कळपामधूनी, नाते नसे कोठले जगाशी ।
मंदिराच्या पायरीवरी, बसून राही एकदिनी
येता महंत जवळी, स्वतः मध्येच दंग राही ।
कोण उद्धट, क्षुद्र जीव तो? गर्जे महंत पायरी उतरता
वीज कोसळे श्वानावरी, झेलता लत्ता प्रहार त्याचा ।
पिसाळलेले श्वान भुंके, रस्तो-रस्ती फिरे अनावर
दात रोवी मांसखंडी, आक्रोश उठे सकल जनांवर ।
मृत्यू द्यावा पिसाट श्वाना, गाव बोलले एकमुखी
जीवित राही श्वान जोवरी, 'गाव' कसे होईल सुखी?
शस्त्रे घेउनी गाव धावे, वेधण्यास श्वान पिसाट
भयभीत ते चोहीकडे, शोधितसे जगण्याची वाट ।
पुन्हा एकदा गाठ पडे, पाहूनी श्वान धावी पुढे
बेभान होउनी दात रोवी, भयभीत महंत धुळीत पडे ।
मारा दुष्ट श्वानाला, महाभयंकर पातक त्याचे
नसे क्षमा त्याला आता, मृत्यू हेच संचित साचे ।
विलाप करण्या जमती सारे, महंताभवती करती कडे
हासत उभा तो असे, तथापि श्वान बिचारे मरून पडे ।
काट्यानेच निघतो काटा, विषावर जालीम विष उतारा
निसर्गाची रीत असे, दुर्बळाला नसे जगी थारा ।
अंतरंग जाणी कोण कुणाचे, दुष्ट कोण अन कोण भले
भुलुनी बाह्य रुपाला, अंध होउनी सृष्टी चाले ।