चल मित्रा पुन्हा
जुन्या वह्या चाळू
चहाच्या कपात
नव्या सयी घोळू
भंगलेल्या कट्ट्यावर
विखुरलेल्या आठवणी
फुंकलेल्या कांडीमागे
धुरकटलेल्या आठवणी
भुत भविष्यासवे
वर्तमानाचा खेळ
भटाच्या कटींगमध्ये
किती विषयांची भेळ
प्रेमभंगाचे 'दारू'ण
दु:ख पेल्यात तेव्हा
झेपला ना 'ग्लास'
आपल्या खिशास जेव्हा
जे आले, जे गेले ते
सारेच केले साजरे
खांद्यावरी हात तुझा
अन घोट गरम ते बरे
अरे, मित्रा..
प्रश्न, प्रपंच नेहमीचे
खुंटीस घट्ट बांधलेले
उभे चौकटीचे ओझे
चालणे ही रेंगाळलेले
आपणचं हे मांडलेले
सारे आपलेच पसारे
घटकाभर घे सवड
थोडा वेळ काढ रे
चल मित्रा पुन्हा
जुन्या वह्या चाळू
चहाच्या कपात
नव्या सयी घोळू