डहाळीला गाणे सुचले कोवळे एक फूल फुलले
पाकळी शब्द शब्द हळवा अर्थ गंधातुन दरवळले
वाचले फूलपाखराने गीत ते मधाळ नाजुकसे
सुगंधी वाऱ्याला कळले गुपित वेलीचे इवलेसे
वेल तालावर हिंदोळे भान काही न तिला उरले
डहाळीला गाणे सुचले
स्वतःशी गुणगुणती झाडे रानभर सळसळली पाने
नभाला सप्तसूर नेले लकेरून धुंद पाखराने
भेटता सूर ओळखीचे फुलावर दवबिंदू हसले
डहाळीला गाणे सुचले
फूल निर्माल्य न झाले ते गान ते आता वाऱ्याचे
शीळ ते धुंद पाखराची रंग ते फूलपाखराचे
सूर रंगातुन पाझरले स्वरांतून इंद्रधनू झरले
डहाळीला गाणे सुचले