स्वप्नातल्या फुलांनो

स्वप्नातल्या फुलांनो
भेटून कोण गेले
वाटते पैंजणीचे
झंकार सांडलेले

सांगू नकोस राया
कोजागिरीत न्हाया
दिसतील ना शशीला
तू दंश नोंदलेले !

बेभान जीव झाला
प्रेमात रंगलेला
वाटे असे पुन्हा का
 हरवून साज गेले ?

ही हारजीत आहे
की तुझीच प्रीत आहे ?
शब्दातून भावनांना
 उधळीत गीत गेले..

ही रात्र अजुनही का
जणू कोंदणात आहे
वाटे वरी सुरांच्या
का हुंकार गुंतलेले ?

स्वप्नातल्या फुलांनो
उमला पुन्हा कधीही
ओठांतून देठांच्या या
मी स्वप्न माळलेले..!!!