आज देवीची स्थापना.
नऊ दिवसांचा उपास अन तोही अनवाणी पायांनी.
फार जपावं लागतं...... देवी जागृत आहे ना..
अरे, पण ती एक स्त्री आहे.
छे! छे!...
अरे ही तीच..
जिच्या गर्भातला तिचाच अंश आकारा येण्याआधीच खुडला..
अन चुकून जन्मा येताच कचराकुंडीत उंदरा-कुत्र्यांना टाकला.....
जिला शाळेत पाठवण्याऐवजी घरकामात जुंपलं...
उंबरठ्याच्या आत व सातच्या आत घरात बसायची तंबी दिली वेळोवेळी..
जिच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या, महिला दिनाला गप्पा मारून तिच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली...
अरे ही तीच..
जिला कित्येकदा वासनेचा बळी बनवले सामूहिकरीत्या...
जाळले तिच्या बापाच्या पैशासाठी...
जिला विकली पाच-पन्नास रुपड्यासाठी..
सजवली नववधू बनवून रोज नव्या गिऱ्हाईकासाठी...
अरे ही तीच..
जिचा कायम मत्सर केला बॉसच्या खुर्चीत असताना..
लगटलास कनिष्ठ सहकारी असताना...
जिला फेडलीस येता-जाता विखारी नजरेने..
अरे ही तीच..
जी आहे आत... स्वयंपाकघरात..
पहाटेपासून रात्रीपर्यंत राबतेय..
जरा नीट बघ तरी...
अरे ही तीच आहे रे.
ऐकतोस ना???????????