आप्पा..

(माझ्या प्रिय आजोबांच्या चरणी अर्पण! त्याना जाऊन आठ वर्षं होतील पण अजुनही त्यांची आठवण मनात ओली आहे )

एका क्षणात आम्हाला सोडून, गेला आहात किती दूर
हरघडी तुमचेच स्मरण, मनात दाटली हूरहूर.

नव्हती कन्या जरी, नातीवरती केव्हढी माया
जाताना बरोबर घेऊन गेलात, आमच्यावरची छत्रछाया.

भाद्रपदात आता ,गोरी गणपती येतील
पुजा आरती करतानाच्या, तुमच्या अनेक आठवणी होतील.

घरातल्या प्रत्येक जागी,तुमच्या असण्याचा भास आहे
अगदी तुमच्या सोवळ्यालाही, जुन्या अत्तराचा वास आहे.

नानाविध विषयांवरची, तुमची पुस्तकं आणि केसेटचा कप्पा
आपल्या दोघांची जमलेली गट्टी, आणि जोडीला भरपूर गप्पा.

तुम्हाला काही सांगायचा , कधी धाक नाही वाटला
तरीही मनामध्ये नेहमीच , अपार आदर दाटला.

आज्जीवर तुमचा किती लोभ,तिला दिलीत खंबीर साथ
आता ती ही खूप थकली, सुरुकुतले आहेत तिचे ही हात.

राखीपौर्णिमेला माझ्यासाठी,होत होतात छोटासा भाऊ
इवल्या हातानी मी राखी बांधली ,की मग द्यायचात चिकार खाऊ.

आजही अशीच अगदी ,सहज आली तुमची आठवण
ओघळले आहेत दोन थेंब, अन भरून आले आहे मन...

--पल्लवी.