चांदणे

गर्भरेशमी रात्रीस या, सुगंध चांदण्याचे
भारल्या मनात माझ्या, तरंग चांदण्याचे ।

लाभले मज ईश्वरी दान आनंदाचे
चालते हाती घेउनी हात चांदण्याचे ।

चालती छाया सांभाळूनी ओझे संचिताचे
जागवी माया नाते मन्मनी माझे चांदण्याचे ।

भाववृक्ष सळसळे, वाजे पाऊल मदनाचे
नीरव शांततेत घुमती नाद चांदण्याचे ।

थरथरती ओल्या पानी दवबिंदू स्वप्नांचे
उसळती मनी अनावर सिंधू चांदण्याचे ।

गुंजत राही रानीवनी गीत काजव्यांचे
उजळती काळरात्री दीप चांदण्याचे ।

गवसले वाटेवर ह्या गूढ जीवनाचे
उमगले हलके हलके गूज चांदण्याचे ।