जाणीव...

कुठेतरी दुःख माझं
कण्हत राहतं
अश्रूंना वाट
देत राहतं

आयुष्य संपलेलं
कणाकणांनी
जाणीवेच्या टोकांनी
बोचत राहतं

नाही कधी केला
विचार अधिकाचा
जे सामोरं आलं
तेच माझं होतं

एकेक धागा उकलून
आयुष्याची वीण
उसवलेली
आणि सांधण्यासाठी
सुईचं टोक
मोडलेलं असतं

नजरांचे ते असंख्य वार
अन बोचऱ्या शब्दांचे आघात
सहन करून
भावनांचं तळं
गोठत राहतं

कशाची  तक्रार?
चिंता ही कसली?
दुसरं टोक आयुष्याचं
आपणहून
जवळ येत जातं

यातनांनी मात दिली
माझ्या जाणीवांना
आणि मानलं मी
की आभाळच माझं
तितकंसं मोठं नव्हतं