उणीव

मान्य हे लिहिण्यास माझा काही ना अधिकारही
दूरदेशी राहुनी मी भरतो आहे कविता वही
राहवत नाही म्हणूनच लोकहो लिहितो आहे
या पाहा बघण्यास थोडे काय मी म्हणतो आहे
 
आत्मसन्मानाविना कोणी उभा का राहतो
या जगी यशकीर्तीचे सुख का फुकाचे पाहतो
नेमकी याचीच भासे भारती अनुपस्थिती
पाहता आश्चर्य कसले आजची आपली स्थिती
 
यास उत्तर एक नाही प्रश्न जर का कोण मी
हे स्वतःला फसवणे वा आत्मभानाची कमी
अंतरी ना स्वत्व जगतो घेऊनी उसन्या झुली
संकुचित या खोपट्यांच्या मांडतो भलत्या चुली
 
जाती पंथ प्रांत भेदांचाच पडला फास हा
संभ्रमितशा जाणिवांचा दाटलेला भास हा
हिंदुतेची लाज हा तर आणखी तिसरा तिढा
आमुच्या दुर्बलपणाला का हवा दुसरा धडा
 
लाल हिरव्या दहशतीचा नाच नंगा चालला
चीन पाकिस्तानने आहेच विळखा घातला
अथक येती आपदा दुष्काळ वा पूरही इथे
यां प्रसंगीं एकजुट राहून हे झेलायचे
 
का कुणाची आई येथे आपुल्या मातीविना
सर्व आहो पुत्र झालो बंधू का मातेविना
हीच माती संस्कृती ही हिला पुन्हा उजळायची
विश्वगुरुतेच्या पुन्हा सिंहासनी बसवायची
 
याच मातीच्या सुगंधे भारुनी अवघे जिणे
याच मृद्भावे घरांची सारवावी अंगणे
याच मातीतील तत्त्वे पांघरावी तनुमनीं
घ्यायचे घेऊन जे फेकायचे ते फेकुनी
 
बोलणे गगनातले पण फार हे झाले आता
रोकडे कर्तृत्व काही दावणे आहे आता
आजच्या जगतात मिळते मान्यता केवळ अशी
संस्कृती तत्त्वे असू द्या थोर वा आणखी कशी
 
राहुनी बाहेर हे तर पदोपदी पटते मनी
'या' कुणापेक्षा तरी आमच्यात ना काही कमी
निसटतो आहे परंतु काल हा हातातुनी
काहिशी निर्बुद्धशी ही अधीरता दाटे मनी
 
पण आठवा त्या काळरात्री शेकडो वर्षांतल्या
त्या भयंकर पातशाह्या एका शिवाने झेलल्या
होती दुष्कर ती स्थिती पण आजच्या घटकेपुढे
तरून जाऊ हेही घेऊ झेप गगनी ही पुढे
 
 
दायशान, चीन
२४ सप्टेंबर २००८