दर्शन

दगडात पाहिले तुला, गगनात पाहिले तुला
त्याहूनही भल्या-बुर्‍या कर्मात पाहिले तुला

पाठीवरील कापर्‍या स्पर्शात आशिषे तुझी
निष्पाप बाल-बोबड्या बोलात पाहिले तुला

हिरवे शिवार तूच अन् घनदाट जंगलात तू
होऊन टोळधाडही शेतात पाहिले तुला

सावज तुझेच रूप अन् श्वापद कुणी न वेगळे
बुजगावण्यात पाहिले, पक्षात पाहिले तुला

निढळावरील घाम तू, भाळावरील लेख तू
कष्टात पाहिले तसे दैवात पाहिले तुला

अदिती, दिती सहोदरा सवती बनून नांदल्या
आदित्य, दैत्य समसमा दोघात पाहिले तुला

सार्‍या जगास व्यापुनी उरलास तू दशांगुळे
भव्यात पाहिले तसे सूक्ष्मात पाहिले तुला

ज्ञानेंद्रियांस आकळे, ना इंद्रियांस आकळे
भक्तीत पाहिले तुला, भक्तात पाहिले तुला

पिंडीत पूज्य सांब तू, मूर्तीत राम, कृष्ण तू
निर्गुण, अरूप, "नेति"च्या तत्त्वात पाहिले तुला

नेतात जे तुझ्याकडे 'विक्षिप्त' त्यांस पूजतो
अग्नीत पाहिले तुला, सरणात पाहिले तुला