त्याच्या प्रेमभंगाची कथा - ४

शेरू आणि टॉम्या आश्रमातून विसोबा चौकात परतले. तिथल्या चौकात बसून ठरलेल्या प्लॅनबाबत त्यांची पुन्हा सुरू झाली.
"उद्या रात्री दहा वाजता "ऍक्शन' घेऊ या'' शेरू म्हणाला.
"हो. पण; भाईच्या कुत्र्यांना आपण वेळ कुठे सांगितली शेरू? '' टॉम्यानं प्रश्न उपस्थित केला.
"अरे हो. लक्षातच नाही आलं माझ्या. मी नुसतं उद्या चालतंय म्हटलं. बरं बघू नंतर. नाहीतर जाऊन येऊ परत. चल उद्या भेटू आता.''
शेऱ्यानं मार्ग काढला आणि आपल्या मार्गानं तो निघून गेला.
निवाऱ्याची सध्या सोय नसल्यामुळं टॉम्यानं पारावरच रात्र काढण्याचा निर्णय घेतला.
----
सकाळ उजाडली. टॉम्या गाढ निजलेला होता. पाराजवळ एक गाडी आली. त्यातील माणसांनी दुधाचे कॅन खाली उतरविले. पाराची साफसफाई करण्यासाठी एकानं गाडीतून खराटा काढला. झाडण्यासाठी तो पारावर चढला.
"च्यायचं कुतरडं. ''
शिवी हासडत त्याने उलटा खराटा टॉम्याच्या पाठीत खातला. अचानक बसलेल्या झटक्यानं टॉम्या खडबडून उभा राहिला. जोरात केकाटतच त्यानं पळ काढला. त्या माणसानं पाराची सफाई करून कॅन पारावर ठेवले. लोकही दूध विकत घेण्यासाठी येऊ लागले होते. दोन-तीन तासांत त्यांनी आपलं काम उरकलं. नंतर कॅन गाडीत घालून ते निघून गेले.
टॉम्या त्यांच्या जाण्याचीच वाट पाहात होता. ते गेल्या गेल्या तो पुन्हा पाराजवळ येऊन बसला शेरूची वाट पाहात. बऱ्याच वेळानं शेरू तिथं आला.
"चल रे. भाईकडं जाऊन येऊ. रात्रीचं त्यांना सांगितलं पाहिजे. ''
"जाऊ. बस जरा. सकाळी सकाळी एक दणका बसलाय चांगला. ''
"का रे, काय झालं? '' शेरूनं काळजीनं विचारलं.
"रात्री पारावर झोपायला थांबलो. झोप कुठं येतेय. उद्या काय होणार, या विचारानं डोळ्याला डोळा लागेना. या पोटावरून त्या पोटावर करत होतो. तळमळत होतो. पहाटे पहाटे कुठं डोळा लागला. काळ्याला मी हाणतोय आणि तो गयावया करतोय, असं स्वप्न पडत होतं. तोच त्या दुधवाल्यानं येऊन खराटाच हाणाला. काळ्याला हाणायची इच्छा स्वप्नात अपुरीच राहिली. ''
सकाळचा किस्सा टॉम्या शेरूला सांगत होता. तेवढ्यात भाईचा एक पंटर शेरूला शोधत विसोबा चौकात आला. बाहेरचा कोण कुत्रा आलाय म्हणून दोघेही उभे राहिले. दोघेही गुरगुरत जोरजोरात शेपटी हालवत होते. तो मात्र धीटाईनं जवळ येत होता. तशी या दोघांची गुरगुर वाढत होती. तो जवळ येऊन उभा राहिला.
"शेरूला भेटायचंय. कुठं भेटंल? '' त्यानं खर्जात भुंकून विचारलं.
"हो हो मीच शेरू. काय, कुठून आलाय. ''
"भाईकडून आलोय. ''
"अरे हो. नमस्कार! पाहा, आता आम्हीच भाईकडं यायचा विचार करीत होतो, तर तुम्हीच आलात बरं झालं. आमचा चक्कर वाचला.''
"बरं बरं. भाईनं विचारलय कुत्री किती वाजता पाठवायचीय? '' त्यानं विचारलं.
"दहा वाजता. दहा वाजता चालतंय. नको. तासभर आधी, नऊ वाजता या. आणि कितीजण येणार आहात. ''
"त्ते काही माला माह्यत नाही. पण भाई दहाजण का असं काही तरी बोलत होते. ''
"नको, नको. एवढे काय करायचेत. पाचजणं बास. बास पाचजणं. का रे टॉम्या. '' शेरूनं घाबरतच सांगितलं.
"ठिक्काय. भाईला सांगतो तसं आणि नऊच्याला पाठवतो कुत्र्यांना. '' शेरूचा निरोप घेऊन तो निघून गेला. शेरू आणि टॉम्यानं एकमेकांकडं पाह्यलं. दोघंही खाली बसले. त्यांच्यात पुन्हा प्लॅनची चर्चा सुरू झाली. प्लॅन कसा राबवायचा, याचाही प्लॅन ठरला.
"टॉम्या, काम फत्ते होणार बघ. पण आता बसून काय करायचं. मला तर दहा कधी वाजताहेत, असं झालंय बघ. ''
"चल आपण पारिजातकडं चक्कर मारून येऊ. बघूया तो काळ्या साला काय करतोय ते. '' टॉम्या काळ्याला अद्दल घडवण्यासाठी उतावीळ झाला होता. पण शेरूनं त्याला समजावलं.
"घाई करू नको बाबा. जरा धीरानं घे. सगळं तुझ्या मनासारखं होईल. रात्र होऊ दे आधी. ''
दोघेही पाराजवळच बसून होते. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाचा चटका बसत होता. रात्रीपर्यंतचा वेळ कुठे घालवायचा हा दोघांपुढेही प्रश्न होता. त्यावर शेरूनं तोडगा काढला.
"चल टॉम्या, आमच्या सोसायटीत जाऊ. संध्याकाळपर्यंत झोप काढू आणि पुन्हा येऊ चौकात. चल. ''
दोघेही टॉम्याच्या सोसायटीत जाऊन पसरले.
----
अंधार पडला होता. टॉम्याला जाग आली. त्याला आजूबाजूचं काहीच दिसेना. तो खडबडून जागा झाला. शेरूलाही ढुसनी देऊन त्यानं उठवलं. सर्वत्र काळोख दाटलेला होता. त्यामुळे शेरूलाही वेळेचा अंदाज येईना म्हणून सगळ्या सोसायटीत तो चक्कर टाकून आला. बेलकरांचा दरवाजा तेवढा त्याला उघडा दिसला. हळूच तो घरात शिरला. बेलकरांची नमी त्याला सोफ्यावर पसरलेली दिसली. नमी जागी नसल्याचा अंदाज घेत तो पुढं आला आणि टीव्ही लागून असलेल्या भिंतीवर लटकवलेल्या घड्याळाकडं त्यानं नजर टाकली. आठ वाजले होते. तसाच तो मागे वळला आणि धावपळ करीत खाली आला.
"चल, आपल्याला गेलं पाहिजे शेरू चौकात. '' दोघांनी जोरजोरात अंग झटकलं आणि ते चौकाच्या दिशेने पळाले.
हे दोघं पोहचेपर्यंत भाईची पाच कुत्री पाराजवळ येऊन बसली होती.
"भाऊ तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. बरं झालं तुम्ही आला. '' त्यातील एकजण म्हणाला. आता पुढं काय करायचं, असे भाव त्यांच्या तोंडावर होते. शेरुच्या ते लक्षात आलं.
"चला आपण जरा जाऊन येऊ, '' असं म्हणत तो सर्वांना पारिजात सोसायटीकडं घेऊन गेला. आजूबाजूचा सगळा प्रदेश त्यांनी सर्वांना दाखविला. काही माहितीवजा सूचना दिल्या आणि परत सर्वजण पारावर येऊन बसले. सर्वत्र सामसूम झाल्यानंतर प्लॅन राबवायचा निर्णय झाला. अजूनही बराच रिकामा वेळ सगळ्याकडं होता. एकुणात पाचजण असल्यानं इकडच्या तिकडच्या गप्पांत सगळे जण रमून गेले.
----
रस्त्यावरच्या जाणाऱ्याऱ्येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली. लोकांची हालचाल थांबू लागली होती. पारावरच्या कुत्र्यांच्या गप्पा मात्र रंगात आल्या होत्या. प्रत्येकजण खळखळून भुंकून एकमेकांना दाद देत होते. एव्हाना पाराचा परिसर रिकामा झाला होता. ही गोष्ट टॉम्याच्या लक्षात आली. त्यानं हे शेरूच्या लक्षात आणून दिलं.
"अरे हो. चला निघू या आपण. '' सर्वजण पारिजात सोसायटीच्या दिशेने निघाले. जाताना प्लॅनची कुजबूज सुरूच होते.
सर्वजण नीलांबरी सोसायटीजवळ येऊन थांबले. पुन्हा एकदा प्लॅनची उजाळणी करण्यात आली.
त्यानुसार भाईचे दोघेजण पारिजात सोसायटीजवळ गेले. संपूर्ण परिसरात शांतता होती. रातकिड्यांचा किर्रर्र... आवाज वातावरणात दाटून होता. आजूबाजूला कुणी मनुष्य नाही, याचा अंदाज घेऊन त्या दोघांनी जोरजोरात भुंकण्यास सुरवात केली. चांगले आडदांड होते ते. त्यामुळे त्यांचं भुंकणही कानठाळ्या बसवणारं होतं. त्यांचा आवाज ऐकून काळ्यानं सोसायटीच्या आतूनच जोरात भुंकून त्यांना आवाज दिला.
"कोणएऽऽऽ रेऽऽऽ''
प्रत्युत्तर काही मिळत नव्हते. भुंकणे मात्र चालूच होते. काळ्यानं थोडावेळ त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. पण भुंकणं काही थांबत नव्हतं. मग काळ्यानंही गेटजवळ येऊन त्यांच्या भुंकण्यात आपलं भुंकणं मिळवलं. तिघांचेही भुकंणे टिपेला पोचले होते. तशी फ्लॅटमध्ये चुळबूळ वाढू लागली.
"काय झालंय कुणास ठाऊक, का इवळताहेत कोण जाणे. '
"जाऊ दे रे झोप. आता कुठं रात्रीचा उठतो. थांबतील भुंकायचं थोडा वेळानं. ' अशी कुजबूज ऐकू येत होत होती. यांचे भुंकणे मात्र थांबत नव्हते.
एवढ्यात जिना उतरून एक व्यक्ती दबकत दबकत खाली आली. जिन्याची शेवटीची पायरी उतरल्यानंतर त्या व्यक्तीचा वेग अफाट वाढला. काही कळायच्या आत त्यानं काळ्याच्या टिरीवर काठीनं जोरदार प्रहार केला. अनपेक्षित दणक्यानं काळ्या केकाटत उलटा पडला. हे पाहून भाईचे कुत्रे शांत झाले. पण किंचितही मागे सरले नाहीत. त्यांची गुरगुर सुरूच होती.
काळ्या मात्र त्या प्रहाराने आंतर्बाह्य हादराला. त्यानं केकाटतच नीलांबरीच्या दिशेने धूम ठोकली. भाईच्या कुत्र्यांनाही तेच हवे होते.
नीलांबरी ओलांडून काळ्या रस्त्याला आला. तसा मागून चार कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. मघाच्या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा हा हल्ला. काळ्याला सर्वच अनपेक्षित होते. ते चारही जण कसलाच विचार न करता त्याच्यावर तुटून पडले होते. काळ्या जीवाच्या आकांताने कळवळत होता. ते जमेल तसं त्याला तोडत होते. काळ्या त्यांच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करीत होता... पण अशक्य.
काळ्या पुरता घायाळ झाला होता. त्याची प्रतिकार क्षमता संपून गेली होती. संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं. आता आपला अंत जवळ आलाय, या विचारानं त्यानं प्रतिकार करणं सोडून दिलं आणि तो जमिनीला गच्च चिकटून राहिला. शेरू हा सगळा प्रकार बाजूला उभा राहून शांतपणे पाहात होता. तेवढ्यात निलांबरीच्या तिसऱ्या मजल्यावर काहीतरी वस्तू जोरात त्यांच्याजवळ येऊन पडली. शेरूच्या ते लक्षात आलं. हा प्रकार थांबला नाही, तर आपल्याही पाठी-पोटात दगडं किंवा काठ्या पडतील, याचा अंदाज त्याला आला.
"थांबा रे. पुष्कळ झाले. थांबा. '' शेऱ्यानं जोरात भुंकून सांगितलं. पण चौघेही बिलकूल ऐकण्याच्या मनःस्थिती नव्हते. शेवटी शेऱ्याने मध्ये पडून त्यांना थांबवलं आणि बाजूला नेलं.
काळ्याची हालचाल थांबली होती.
टॉम्या पुन्हा मागं आला. त्यानं काळ्याला हुंगलं तेव्हा त्याला तांबडची आठवण आली. टॉम्याचा राग अनावर झाला होता. तडक जावं आणि तांबडीवर तंगडी वर करून तिला तिची जागा दाखवून द्यावी, असं ठरवून रागाच्या भरात तो पारिजात सोसायटीत गेला. अंधारातच आत घुसला. तांबडीला शोधत त पाण्याच्या टाकीजवळ गेला. तिथं तांबडी नव्हती. त्याच्या डोक्यात आणखी सणक आली. तिला शोधत तो पुढं गेला. पार्किंगमध्ये एक दिवा होता; पण त्याचा प्रकाश अगदीच अंधूक होता. त्या अंधूक प्रकाशातही टॉम्या तिला शोधत होता. प्रत्येक गाडीजवळ जाऊन बघत होता.
शेवटच्या भिंतीजवळ गेला तेव्हा त्याला तांबडी निपचित पडलेली दिसली. तो हळूहळ जात होता... तिच्या अगदी जवळ जाऊन तो उभा राहिला. निरखून तिला पाहू लागला... तिच्या सहवासातील ते सोनेरी क्षण त्याला आठवत होते. त्यात तो गुरफटून गेला होता. तिला अद्दल घडविण्याचा विचार तो पार विसरून गेला होता.
त्याने हलकेच तिच्याजवळ तोंड नेलं. टॉम्या आल्याचं तांबडीनं वासावरूनच ओळखलं होता. तिनंही हलकेच डोळे उघडले. मुंडकं थोडंसं उचलून त्याच्याकडं निरखून पाहिलं.
"तू असंऽऽऽ.... ''
"थांब टॉमी. मला बोलू दे, '' तांबडीनं जड आवाजात त्याला विनवलं. काही क्षण तिथं निरव शांतता.
"मी चुकले टॉमी. याचं प्रायश्चित्त मी घेणारचं. '' तांबडीचा आवाज क्षीण झाला होता. तिनं हलकेच मुडंक जमिनीला टेकवलं आणि डोळे मिटून घेतले.
"बोल... बोल... आज मी तुझंच ऐकणारए. काय चुकलं माझं. का तू असं केलं? '' टॉम्या आवेशानं बोलत होता.
रागाच्या भरात टॉम्याची बडबड सुरूच होती. तांबडीनं चूक कबूल केली याचं त्याला कोण समाधान झालं होतं. ती पुन्हा आपल्याला मिळेल, या विचारानं तो शहारून गेला होता.
टॉम्यानं बोलणं थांबवलं. ती बोलत नव्हती... तिला तो ढुसण्या देऊ लागला; पण प्रतिसाद नव्हता. टॉम्याला संशय आला. त्यानं पुन्हा तिला निरखून पाहिलं. हालचाल पूर्ण थांबलेली होती. तोंडाजवळ जाऊन त्यानं हुंगलं. तांबडीचा श्वासही बंद झाला होता.
त्याची खात्री पटली. वियोगाच्या दु:खानं तो पुन्हा कळवळला. आकाशाकडं पाहून इवळला. बिथरला. भिंतीवर जोरजोरात धडका घेऊ लागला. कपाळातून रक्त वाहत होतं तरी तो धडका देतच राहिला.
त्याची 'वेदना' मरून गेली होती.

-समाप्त