ह्यासोबत
परगांवाहून येणाऱ्या घरातल्याच आणि पाहुणे मंडळींच्या आगमनापासून आनंदोत्सवाची सुरुवात झालेली असली आणि वसुबारस, धनतेरस वगैरे दिवस थोडेसे वॉर्म अप करून गेलेले असले तरी दिवाळीची अधिकृत सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नांवाच्या राक्षसाचा वध केला अशी कथा सांगतात, पण त्याचा आमच्या पहाटे उठून आंघोळ करण्याशी काय संबंध आहे हे कोडे मला लहानपणी पडायचे आणि त्याचे समर्पक उत्तर कधीच मिळाले नाही. देवदेवतांनी अवतार घेऊन अशा कित्येक असुरांचा नाश केल्याची उदाहरणे पुराणात आहेत, मग फक्त या नरकासुराच्या नांवाने आपण आंघोळ कशाला करायची? नरकासुराचा बादरायण संबंध नरकाशी म्हणजेच घाणीशी जोडला तर त्यात तथ्य दिसायला लागते. दिवाळीच्या आधी घरादाराची साफसफाई, रंगरंगोटी करण्याची प्रथा होती. त्यामुळे जुनाट अस्ताव्यस्त घरातले नेहमी उपयोगात न येणारे काने-कोपरे, कपाटे, कोनाडे वगैरे सगळे या वेळी झाडले जात. त्यात सांचलेला कचरा काढून टाकला जाई. परिसराचीसुद्धा सफाई केली जाई, पावसाळ्यात उगवलेले गवत उपटून टाकून आणि उंदीर घुशींनी केलेली बिळे लिंपून सगळे आवार स्वच्छ केलेले असे. हे सगळे दिवाळीच्या आंत करायचे असल्यामुळे टाळाटाळ न करता ते वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असायचे. ते होईपर्यंत दिवाळीचा दिवस उजाडायचाच. त्याची सुरुवात शरीराच्या स्वच्छतेने करणे सुसंगतच म्हणावे लागेल.
नरक चतुर्दशीच्या दिवशी झाडून सगळे जण भल्या पहाटे उठून बसत. त्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यापूर्वी सर्वांगाला खोबऱ्याचे सुगंधी तेल लावून चांगले मालिश करायची पद्धत होती. त्या काळात व्हॅनिशिंग क्रीम, कोल्ड क्रीम, मॉइश्चराइजर यासारखे शब्द ऐकूनसुद्धा माहीत नव्हते. या तेल लावण्यामुळे त्वचेला जो स्निग्धपणा मिळतो तो चांगला परिणामकारक असला पाहिजे. त्यामुळे थंडीची सुरुवात होतांना झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे त्वचेला जो रुक्षपणा येऊ शकतो तो टाळण्यासाठी वेगळे उपाय करायची गरज पडत नसावी. अंगाला तेल चोपडून घेतल्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करायचे. त्यासाठी बंब होताच, त्याशिवाय पाण्याचे मोठे हंडे तापवून ठेवलेले असायचे. हे स्नान सूर्योदय होण्यापूर्वी करण्यासाठी घाई असायची. जो कोणी आळशीपणा किंवा चेंगटपणा करेल तो नरकात जाईल अशी भीतीही दाखवली जायची. आंघोळ झाल्यानंतरसुद्धा उटण्याचा मंद सुवास येत रहायचा आणि मन प्रसन्न होत असे. त्यानंतर मोजकेच फटाकडे, फुलबाज्या वगैरे उडवायचे. कोणी अंगणात रांगोळ्या घालायला लागत. पण सर्वांचे सगळे लक्ष फराळाचे बोलावणे येण्याकडे लागलेले असे.
देवाची पूजा आणि नैवेद्य दाखवून झाला की फराळाला सुरुवात होत असे. यातले सारेच पदार्थ आधी तयार करून ठेवले असलेले असले तरी नैवेद्य दाखवून झाल्याखेरीज ते चाखून पाहण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याची चंव पाहण्याची उत्कंठा सर्वांनाच असायची. लाडू, करंज्या, चिरोटे व अनरसे हे गोड पदार्थ आणि शेव, चिवडा, चकल्या व कडबोळी हे तिखटमिठाचे पदार्थ असायचेच. शंकरपाळ्यांच्या गोड आणि तिखटामिठाच्या अशा दोन्ही प्रकारच्या आवृत्या असत. लाडूमध्ये रवा, बेसन, संमिश्र असे प्रकार असत आणि त्यात पुन्हा पाकातले कडक आणि पिठीसाखर मिळवून केलेले ठिसूळ असे उपप्रकार असत. त्यातला एकादा प्रकार फराळात, दुसरा जेवणात, तिसरा बांधून देण्यसाठी वगैरे विभागणी होत असे. इतर पदार्थांमध्येसुद्धा अशीच विविधता असे.
खाण्याचे इतके प्रकार आणि पदार्थ असतांना मुलांना आणखी काय पाहिजे? "हरहर महादेव" करून त्यावर तुटून पडायचे. फराळ खातांखातांनाच मधून मधून "कडबोळी या वेळी छान खुसखुशीत झाली आहेत.", "म्हणजे काय? माझी नेहमीच होतात.", "चांगलं भरपूर मोहन घातलं तर कां नाही होणार?", "पण शेव थोडी कडकडीत राहिल्यासारखी वाटते.", "तशी नसली तर तिचा चुरा होणार नाही का? मग तो भुगा कोण खाईल?", "अनरसे थोडे चिवट वाटतात ना?", "अगं बाई, डब्याचं झाकण चुकून उघडंच राहिलं वाटतं.", "ही हवा तर अशी आहे! सर्दावायला जरासुद्धा वेळ लागत नाही", "ते जाऊ दे, पण चंवीला किती मस्त झाले आहेत?", "ही करंजी दिसायला एवढी मोठी, पण फोडली की नुसती पोकळ!", "तुला काय पुरणानं गच्च भरून पाहिजे?", "कडबोळी काय मस्त झाली आहेत?", "त्यात थोडा ओवा परतून घातला आहे. त्याने वेगळी चंवही येते आणि पचनालाही मदत होते." अशा प्रकारे फराळातल्या प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण होत फराळाचा कार्यक्रम सावकाशपणे चांगला रंगायचा.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळी आणि सकाळचा फराळ हे मुख्य भाग झाल्यानंतर दिवसभर कांही काम नसायचे. पहाटे लवकर उठल्यामुळे अर्धवट झालेली झोप पूर्ण करण्यासाठी दुपारी ताणून द्यायची. दिवेलागणी व्हायच्या सुमाराला पणत्यांच्या रांगा आणि आकाशदिवा लावायचा. एक उंच काठी उभी करून त्यावर तो लावण्यासाठी माडीवर खास व्यवस्था करून ठेवलेली होती. काठीच्या वरच्या टोकाशी झेंड्यासारखा आमचा आकाशकंदील अडकवलेला असे. त्याला बांधलेली एक दोरी सैल सोडून तो अलगदपणे खाली उतरवून घ्यायचा, त्यात पेटलेली पणती जपून ठेवायची आणि हलक्या हाताने ती दोरी ओढून हळूहळू तो दिवा वर चढवायचा हे कौशल्याचे काम होते, पण आजूबाजूच्या घरातल्या आकाशदिव्यापेक्षा आमचा दिवा जास्त उंच आहे आणि त्यामुळे दूरवरूनसुद्धा तो दिसतो याचा केवढा अभिमान त्यावेळी वाटायचा. आमचा मुख्य मोठा आकाशकंदील परंपरागत पद्धतीचाच असायचा, पण हौसेसाठी कधीकधी तारा, विमान यासारख्या आधुनिक आकारांचे दुसरे आकाशकंदील तयार करून ते दुसरीकडे लावत असू. हे सगळे कलाकौशल्याचे काम घरातच चालायचे आणि मुलेच ते करायची.
दिवाळीच्या दुसरे दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे. घरातल्या सगळ्या लोकांनी, विशेषतः स्त्रीवर्गाने नटून थटून, सजून धजून तयार होऊन बसायचे. या वेळी कोणी कोणता पोशाख आणि दागिने घालायचे हे ठरवण्याची चर्चा आधीपासून चालत असे आणि नंतर बरेच दिवस त्याचे कौतुक रंगत असे. लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा खास शिक्का चिंचेने आणि रांगोळीने घासून चमकवून तयार ठेवलेला असे. एका पाटावर लक्ष्मीपूजनाची मांडणी होत असे. पाठीमागे कमळातल्या लक्ष्मीचे फ्रेम केलेले चित्र उभे करून ठेवायचे. चांदीच्या तबकात तो शिक्का आणि अंबाबाईची मूर्ती ठेवायची, बाजूला एक दोन दागिने मांडून ठेवायचे. समोर विड्याची पाने, त्यावर चांदीचा बंदा रुपया, सुपारी, खारीक, बदाम, नारळ वगैरेंची कलात्मक रीतीने मांडणी करायची. मुख्यतः झेंडूच्या फुलांनी सजावट करायची, त्यात अधून मधून शोभेसाठी लाल, पिवळ्या, पांढऱ्या शुभ्र अशा वेगळ्या रंगाची फुले घालायची. सगळे कांही व्यवस्थित असायला पाहिजे तसेच आकर्षक दिसायलाही पाहिजे. बाजूला एक घासून घासून चमकवलेली पितळेची उंच सुबक अशी समई तिच्यात अनेक वाती लावून ठेवायची. एका मोठ्या चांदीच्या ताटात पूजेची सर्व सामग्री मांडून ठेवायची. त्यात फुले, तुळस, दुर्वा, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, अष्टगंध, निरांजन, उदबत्त्या, कापराच्या वड्या वगैरे सगळे सगळे अगदी हाताशी पाहिजे. पूजा सुरू झाल्यानंतर "हे नाही", " ते आणा" असे होता कामा नये आणि तसे कधीच होतही नसे. लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी त्या मोसमात बाजारात जेवढी फळे मिळत असतील ती सारी हवीतच, तसेच एरवी कधी खाण्यात नसलेल्या भाताच्या लाह्या आणि बत्तासे असायलाच पाहिजेत. त्याशिवाय लाडू, गुलाबजाम यासारखी एक दोन पक्वान्ने ठेवीत.
पंचांगात दिलेला मुहूर्त पाहून वेळेवर लक्ष्मीची षोडशोपचार पूजा होत असे. घरातली बाकीची सारी कामे आधी आटोपून किंवा तशीच सोडून देऊन पूजेच्या वेळी सर्वांनी समोर उपस्थित असायलाच पाहिजे असा दंडक होता आणि सगळेजण तो हौसेने पाळत असत. यथासांग पूजा, आरत्या वगैरे झाल्यानंतर थोडा प्रसाद खाऊन फटाके उडवायचा कार्यक्रम असे. आजकाल मिळणारे आकर्षक चिनी फायरवर्क त्यावेळेस नव्हते. फुलबाज्या, चंद्रज्योती, भुईचक्रे, कारंजे, बाण, फटाकड्यांच्या लड्या आणि लहान मोठ्या आकाराचे फटाके किंवा बाँब एवढेच प्रकार असायचे. अगदी लहान मुलांसाठी केपांच्या बंदुकी, साप वगैरे असत. वयोमानानुसार आणि आपापल्या आवडीनुसार ज्याने त्याने मनसोक्त आतिषबाजी करून घ्यायची.
मुलांचे फटाके उडवणे सुरू करून दिल्यावर त्याची थोडी मजा पाहून मोठी माणसे बाहेर पडायची. फटाके उडवणे झाल्यानंतर आम्ही त्यांना गाठत असू. बाजारात केलेली दिव्यांची सुंदर आरास पाहत पाहत ती डोळ्यांत साठवून घेत असू. बाजारपेठेतल्या दुकानदारांच्या पेढ्यांवर थाटांत लक्ष्मीपूजन झालेले असे. आमचा कसला व्यापार धंदा नसल्यामुळे घरातल्या पूजेत त्याच्या हिशोबाच्या चोपड्या वगैरे नसत. दुकानदारांच्या पूजेत त्यांना महत्वाचे स्थान असायचे. दुसरे दिवशी व्यापारउद्योगांचे नवे वर्ष सुरू होत असे. त्याआधी नव्या वह्यांची पूजा करून नवे वर्ष भरभराटीचे जावो, सगळ्या उलाढालीत नफाच नफा होवो अशी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करत. ओळखीचे दुकानदार आग्रहाने बोलावून आपल्या शेजारी गादीवर बसवून घेत आणि पानसुपारी व प्रसाद देत. नवीन कपडे यथेच्छ चुरगळून आणि मळवून पण अद्भुत वाटणारा अनुभव घेऊन आम्ही परतत असू.
.......... (क्रमशः)