ह्यासोबत
पूर्वीच्या काळातल्या कुटुंबप्रमुखांचा दरारा एकाद्या सर्वसत्ताधीशासारखा असायचा. त्यांना विरोध करण्याची तर कोणाची प्राज्ञा नसायचीच, पण एरवीसुद्धा घरातले लोक त्यांच्यासमोर थोडे धांकातच उभे राहत असत. त्यात दिवाळीतला पाडवा हा खास कुटुंबप्रमुखांचा दिवस असे. मात्र त्यांचे प्रेमळ कुटुंबवत्सल रूप त्या दिवशी सर्वांना जवळून पहायला मिळत असे. त्या दिवशी ओवाळणीचा मोठा समारंभ होत असे. अग्रपूजेचा मान माझ्या वडिलांचा असे. माझी आई, बहिणी, वहिन्या वगैरे घरातील सर्व सुवासिनी त्यांना ओवाळून घेत, तसेच सर्व लोक वांकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत. कुणाच्या पाठीवरून हात फिरवून, कुणाला जवळ घेऊन, लहान मुलांना मांडीवर बसवून घेऊन ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करीत. चांगल्या कामाचे कौतुक करून त्याला शाबासकी देत. शुभाषीर्वादाबरोबर सर्वांना कांही बक्षिस किंवा खाऊसुद्धा मिळत असे. त्यानंतर पतिपत्नींच्या जोड्या यथानुक्रमाने येत. आपापल्या पतीला ओवाळून बायका त्यांच्याकडून एकादा दागिना किंवा उंची साडी अशी मौल्यवान भेटवस्तू मिळवीत आणि लगेच ती परिधान करून येत. त्याचे सर्वांकडून तोंड भरून कौतुक होत असे.
उखाण्यात नांवे घेऊन या कार्यक्रमाची सांगता होत असे. आजी झालेल्या ज्येष्ठ महिलादेखील या वेळी वक्त सिनेमातल्या अचला सचदेवला लाजवतील एवढ्या लाजून चूर होत. नव्या नवऱ्या एकादा उखाणा घोकून आलेल्या असल्या तरी आयत्या वेळी गोंधळून जाऊन तो न आठवल्यामुळे "समोरच्या कोपऱ्यात उभी व्हिंदमाता.. " यासारखे कांहीतरी होत असे. पण अनुभवी स्त्रिया त्यांना लगेच सांवरून घेत. त्यामुळे "... चे नांव घेते तीन गडी राखून " असले मात्र कांही होत नसे.
भाऊबीजेचा दिवस खास बंधुभगिनी प्रेमाचा. खूप मंडळी जमा झालेली असल्यामुळे घरातल्या प्रत्येक मुलाला १-२ वर्षाच्या चिमुरडीपासून १-२ मुलांची आई झालेल्या ताई, माई, अक्कापर्यंत लहानमोठ्या बहिणी असत, त्याचप्रमाणे प्रत्येक बहिणीला तान्ह्या बाळापासून मिशी फुटलेल्या दादापर्यंतचे भाऊ असत. भावंडांमध्ये चुलत, मावस, आत्ते, मामे असा भेदभाव होत नसला तरी सख्ख्या बहीणभावांचे प्रेम जरा जास्त उतू जात असे. सकाळपासूनच सगळ्या भावांचे लाड सुरू होत असत. जेवणातसुद्धा याच्या आवडीची अमकी भाजी हिनं मुद्दाम बनवली आणि त्याला आवडते म्हणून तमकी कोशिंबीर तिनं केली आहे वगैरे आवर्जून सांगितले जात असे आणि त्यावरून थोडासा प्रेमळ संवादही होत असे.
भाऊबीजेच्या ओवाळणीचा कार्यक्रम थाटात होत असे. आधी समस्त बालगोपाल नवे कपडे घालून एकसाथ रांगेने पाटावर बसत. मुलीसुद्धा चांगल्या नटून थटून तयार होत. मोठी झालेली एक एक मुलगी एक दोन लहान मुलींना हाताशी धरून सर्व भावांना ओवाळीत असे. ओवाळणी घालण्यासाठी प्रत्येक मुलाच्या हातात बंद्या रुपयांची नाणी देऊन ठेवलेली असत. ती कमी पडलीच तर पहिल्या फेरीत ताटात टाकलेली नाणी उचलून पुढील फेरीत घालण्यासाठी पुन्हा उपयोगात आणत. या वेळी कपाळाला कुंकवाचा टिळा लावणे, निरांजनाने ओवाळणे, डोक्यावर अक्षता टाकणे वगैरे क्रियांना महत्व असे. त्या व्यवस्थित झाल्याच पाहिजेत. कोणाला कोणी किती ओवाळणी घातली याला कांही महत्व नव्हते. मुलांच्या ओवाळण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मोठ्या माणसांचा होई. त्यात मिळालेली ओवाळणी मात्र बहिणी ठेऊन घेत आणि आपल्याबरोबर घेऊन जात.
भाऊबीजेबरोबर दिवाळीची सांगता होत असे आणि परगांवी जाणाऱ्यांची घाई सुरू होई. किरकोळ रजा टाकून आलेल्या लोकांना कामावर हजर व्हायचेच असल्यामुळे लगेच निघावेच लागे. मुलांच्या शाळा सुरू व्हायला दोन चार दिवस वेळ असेल तर त्यांना राहण्याचा आग्रह केला जाई आणि त्याला मान देऊन त्यांचा मुक्काम एक दोन दिवसाने वाढत असे. ज्यांना कसलेच वेळेचे बंधन नसेल अशा पाहुण्यांना थांबवून घेतले जाई. "आज अमका वार आहे ", "तमकी तिथी आहे ", "एका दिवशी तीघांनी तीन दिशांना जायचे नसते ", " आभाळात ढग दिसताहेत" अशी वेगवेगळी कारणे त्यासाठी दिली जात. कॉलेजात शिकण्यासाठी शहरात राहणाऱ्या मुलांना स्वतःलाच परत जाण्याची घाई नसे. ती आपण होऊनच शक्य असेल तोंवर रेंगाळत. आठवडाभरात आमच्या शाळा उघडत, सगळी पाहुणे मंडळी परतून गेलेली असत आणि नेहमीचे रूटीन सुरू होऊन जाई.
त्या वेळची सर्व मुले मोठी होऊन नोकरीला लागली आणि दहा दिशांना पांगली. मागची पिढी काळाच्या पडद्याआड गेली. गांवातल्या वाड्याची देखभाल करायला तिथे राहणारे कोणीच राहिले नाही. त्यामुळे तोही विकला गेला. दिवाळीला सगळ्यांनी एकत्र जमायला जागाच राहिली नाही. आधी आधी दोन किंवा तीन भावंडे कोणाकडे तरी जमत असू. संसाराचा व्याप वाढत गेला तसे तेही जमेनासे झाले. आपापल्या घरकुलात राहूनच दिवाळी साजरी करू लागलो.
आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दर दिवाळीला घरात एकादी मोठी वस्तू येऊ लागली, चांगल्या प्रतीचे फॅशनेबल कपडे, तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया, लहानपणी दृष्टीलाही न पडलेले सुके मेवे वगैरे गोष्टी घरी येऊ लागल्या. झगमगत्या रंगीबेरंगी दिव्याच्या माळांनी बाल्कन्या उजळून उठल्या, त्यांच्यापुढे मिणमिणत्या पणत्यांना पूर्वीएवढे महत्व राहिले नाही. नाना प्रकारचे चित्रविचित्र फटाके उडवले जाऊ लागले. दिवाळीत सर्वांच्या अंगात तेवढाच उत्साह असायचा, पुढल्या पिढीतली मुले त्यात मनसोक्त रंगायची, मी सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होत राहिलो. पण लहानपणी खूप लोकांनी एकत्र येऊन दिवाळीचा सण साजरा करण्यात जी अपूर्व मजा येत होती त्याची सर कितीही पैसे खर्च करून येण्यासारखी नाही असे मात्र मनात कुठे तरी वाटायचे.
आमच्या पिढीतली मुले शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेरगांवी जाऊन देशभर विखुरली गेली असली तरी सुरुवातीच्या काळात ती दिवाळीला घरी येत असत. ते बंद झाल्यानंतर ती मंडळी दिवाळीचा सण उत्साहाने आपापल्या घरी धुमधडाक्यात साजरी करू लागली. पुढल्या पिढीमधल्या मुलांच्या स्मरणात त्याच्या स्मृती साठत राहिल्या. आता ती मुले मोठी होऊन जगभर विखुरली आहेत. परदेशात राहणाऱ्या मुलांना दिवाळीसाठी इकडे येणे अशक्य असते आणि तिकडे दिवाळीला सुटी नसते. पण दर वर्षी दिवाळी येताच त्यांच्या मनातल्या त्यांच्या लहानपणातल्या आठवणी जाग्या होतात आणि सकाळी व संध्याकाळी जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात तो दिवाळीचा सण ते साजरा करतात. कांही ठिकाणी दिवाळीच्या दिवसातला एक रविवार पाहून बरीच स्थानिक भारतीय मंडळी एकत्र जमतात आणि नाचगाणी, पोशाख, खाणेपिणे वगैरेमध्ये भारतीय पद्धतीने जमेल तेवढा जल्लोश करून दिवाळीची धमाल अनुभवतात. यालाच 'दिवाळी' म्हणतात असे कदाचित त्यांची मुले समजतील. माझे हे लेखन त्यांच्या वाचनात आले तर त्यांना ते एक 'सुरस आणि चमत्कारिक वर्णन' वाटायची शक्यता आहे कारण यात दाखवलेले कौटुंबिक वातावरण त्यांनी कधी अनुभवलेले नसेल.
........ ..... ..... ......... (समाप्त)