ही

कधी कधी ही पावसासारखी वागते
भिजवता-भिजवता नख शिखांत भिजते
सहा ऋतूंचे सहा सोहळे रोजच ते घरी
क्रमवारी त्यांची सांगणे जरा कठीण असते
ताण-तणाव, चिंता या हीच्याही भोवती
मनासोबत मग हीही चार गिरक्या मारते
बरीच स्वप्ने हीने किचनच्या कोनाड्यात टाकलीत
सांगूनसुद्धा ही तिथली धुळ झाडायचे टाळते
हीच्यापाठोपाठ पहाटे गजर ही आरवतो
चंद्र कलताच गुपचूप बाम लावून ही टेकते
रांगोळी, पुजा, स्वयंपाक, धुणी, अभ्यास वगैरे
संध्याकाळी बेल वाजताच केसांवर फणी मारते
'आज चेहऱ्यावर अशी इतकी टवटवी कशी? '
या प्रश्नावर मात्र नकळत ही फक्कडशी लाजते
ओसामा वा ओबामा नसतात हीच्या कधी गावी
'उद्या कोणती भाजी? ' हेच हीला भंडावते
चार भिंती, चार माणसे, चार ओळखी शेजारच्या
'आकाशाला क्षितिजही असते' हेच विसरून बसते
हल्ली मी हीच्यावर कविता करतच नाही
रोज नवी कविता बनून हीच समोर ठाकते