अजिंक्य म्हणती किल्ला, मग या पळवाटा का रे?
उरात नाही खळबळ, मग तीरास लाटा का रे?
जळी, स्थळी, पाषाणी, जन्मास येती जीव जंतू
मानवा तुझ्या जन्माचा, हा बोभाटा का रे?
देवाघरची फुले, अवती भवती ही मुले
मंतीमंदाच्या जगी, ये अंगा काटा का रे?
आलो, पाहीले, हरलो, सर्वस्व गेले अंती
मांडती डाव पुन्हा मग, ते सारीपाटा का रे?
देऊनी अहिंसा मंत्र, एक महात्मा तो गेला
त्यांच्याच कथित वारसा, हा फौजफाटा का रे?
कावडवाला श्रावण, ही गोष्ट होती आवडती
अंधारल्या गॅलरीत, त्या जर्जर खाटा का रे?
ते जिवंत होते काल, भुकबळी जाहले आज
पितरास घालीशी जेवण, या वहिवाटा का रे?
हिशोब उभे आडवे, अन बाकी बेरीज वजा
साडेसातीचा हा, पाढा उफराटा का रे?
जन्मासवेच ठरला जर येणाऱ्याचा अंत
मग त्या पामरा उगा, हा हेलपाटा का रे?