रंगरंगुनी चमकणे तिला कधीच जमले नाही
नटुनी सजुनी मिरवायाचा सोस मात्रही नाही
साध्या सोप्या शब्दांमधुनी मलाच मांडत जाते
ती कविता माझी....
ती कविता माझी....
कधी अनावर शब्दांच्या त्या अनाहूतशा ओळी
ओठांमधूनी कधी उमटते नाजूकशी रांगोळी
मन हाताला जिच्या धरूनी कागदावरी येते
ती कविता माझी....
ती कविता माझी....
पापणीत मिटणाऱ्या येउन नीज तोलुनी धरते
पहाटवाऱ्यासंगे शिरुनी मनात किलबिल करते
तिचे अवेळी येणे माझे जगणे होऊन जाते
ती कविता माझी....
ती कविता माझी....
आनंदाच्या क्षणास माझ्या आरास तिचा चेहरा
वेदनेतही मिसळून जाते रंग होऊनी गहिरा
उन असो की पाऊस सावलीपरी सोबती येते
ती कविता माझी....
ती कविता माझी....