ती तेवते शेवटच्या श्वासापर्यंत
मिणमिणत्या प्रकाशाची उधळण करत
प्रत्येक मंगलसमयी...... सणासुदीतही
पण नेहमीच बाहेर
दाराबाहेर.... उंबऱ्याशेजारी
खिडकीबाहेर..... तुळशीशेजारी
पण ती येते घरात..
जेव्हा आपलं कुणी सोडून जातं साथ
पसरवून जातं खिन्न अंधार
घरात... उरात
नेमकी तेव्हाच ती उजळत येते... पिठाच्या पांढऱ्या परिघात
नकळत मिटवत जाते भवतालचा अंधार
औदासिन्य जाळत...
इवलीशी ज्योत देऊन जाते कोसळलेल्या मनाला उभारी
कधी कधी हीच सोनसळी ज्योत
जळता - जळता उजळवून जाते
कैक ज्योती सभोवती
अन हळूच सांगते कानात विझता-विझता
जगा अन जमल्यास जगवा सुद्धा.