गारवा

असंभव सारे
घडोनिया गेले
शहारे उरले
काही फक्त ।

इथे वेदनेचा
उसळे सागर
दाटते काहूर
काळजात ।

तप्त दिनमणी
जाळी आसमंत
जग नाशवंत
आज भासे ।

दाटे अंधःकार
चारही दिशांत
वाटे दिनरात
एकरूपं ।

लागलासे ध्यास
ठायी ठायी भास
गारव्याची आस
मज लागे ।