झाले म्हणून माझे, गा तू तुझेहि थोडे
राहून शांत आज घालू नकोस कोडे !
निद्रिस्त पाकळ्यांचे नक्षत्र-स्वप्न एक
जागेपणा तुझा हा, स्वप्ने तशीच कैक !
निमिषार्ध पापणी ही झुकते, पून्हा उभारी
की बद्ध एक पक्षी, घेतो नभी भरारी !
सानंद भारलेल्या वेलीवरील फूल
ऐसे तुझे सुगंधी दे आज छान बोल !
म्हणशील, "आज माझे गाणेच मौन झाले! "
का सांग मौन हेही मग ऐकण्यास आले?
बेभान हो सखे गं, घे मुक्त एक तान
दाटून सांज आली, भारावले नि रान !
गा तू तुझे खुशाल, माझे नकोस गाऊ
मौनीच आज गाणे मागे नकोस ठेवू !!