..............................
खरी त्यातच बहार!
..............................
दोन देहांमध्ये आहे
एका स्पर्शाचे अंतर
मने म्हणत राहिली
पण- 'नंतर नंतर '!
झाली आहे कधीचीच
हृदयांची जवळीक
मात्र स्पंदनांना वाटे
'हे न खरे; हे न ठीक '!
स्वप्ने बोलतात रात्री
जरी वेगळीच भाषा
डोळे सांगतात परी
'बरी नव्हे अभिलाषा '!
स्पर्शावाचून स्पर्शावे...
बोलीवाचून बोलावे...
जीव तोलती हे सारे...
कसे देहांनी तोलावे ?
दोघांदरम्यान अशी
कुणी आखली ही रेघ?
जर होणार न रिते....
कुणी भरले हे मेघ?
* * *
जन्मभराचा हवा की
हवा क्षणिक आनंद?
झाला उत्तरावाचून
प्रश्न काळजात बंद!
दोन्ही कुड्या अगतिक
मने समजूतदार...!
मिळतानाच निसटे...
खरी त्यातच बहार!!
- प्रदीप कुलकर्णी
रचनाकाल ः ७ जानेवारी २००९