.........................................
छंदातच लिहिण्याचा छंद मला!
.........................................
छंदातच लिहिण्याचा छंद मला!
स्फुरता गीत; मिळे आनंद मला!
मन माझे लिहिताना भ्रमर बने
रुणझुणती, गुणगुणती लहर बने
जोजविते नादवलय मंद मला!
कमळाचे फूल निळे गीत जणू
एकेका पाकळीस ओळ म्हणू
मिळतो आशयघन मकरंद मला!
लय विहरे गुंजारत सहजपणे
मग माझ्या गीताला काय उणे?
शब्द नको कुठला स्वच्छंद मला!
मज येई तुजमुळेच अर्थ जरा
तुजशिवाय छंद नको मज दुसरा
कर गीता, कर तुझ्यात बंद मला!!
- प्रदीप कुलकर्णी
.........................................
रचनाकाल ः २० जानेवारी २००९
.........................................