बालपण देगा देवा

हा माझा पहिलाच लेख आहे. खुप दिवसांपासून लिहायचा प्रयत्न करत होते पण आज लिहायचेच असे ठरविले आणि बसलेच लिहायला . काही चुकले तर समजून घेणे. १-२ लिखाणानंतर सुधारणा होईलच!! जसे सुचले तसे लिहिले आहे.

भाउ माझ्यापेक्षा २ वर्षानी मोठा. आम्ही दोघेच असायचो खेळायला. खुप वेळा आजीआजोबांकडेच जायचा अमचा वेळ. आता लाड करायला दोघेच मग कय विचरता.. मज्जाच मज्जा असयची आमची. तशी परीस्थिती बेताचीच पण सर्व समाधानी होते. दोन मामा मिळून दुकान चालवायचे.    

रोज सकाळी उठल्यावर मऊ भात खाउन खेळायळा पळायचे.. ते जेवायच्याच वेळी यायचे. अंगणात पेरुचे झाड होते. त्याला आजी नि आलेलिंबू चा रस बाटलिला लाउन ठेवलेला असायचा. आणि तो आम्हादोघांना हवा असायचा. पण लहान मुलांनी पोटात दुखल्यावरच प्यायचा असा नियम होता घरात (काय पण.... मोठी माणसं लहान मुलांच्या आवडत्या गोष्टी करतात आणि खायला देताना नुसती नाटकं करतात.     ). मग रोज दुपारी एकच वाक्य "पोटात दुखतयं पोटात दुखतयं " मग दया आली कोणाला तर मग अर्धा चमचा तो रस मिळायचा. पण अम्हाला चांगला  भांडभर हवा असायचा. मग काय! दादा (माझा मोठा भाउ : जो जगातला सर्वात हुशार मुलगा असा मझा मोठा (गैर)समज असायचा ) त्याने एक युक्ती काढली. झाडवर चढायला शिकला (अर्थात कोणाचे लक्ष नसताना)सर्व दुपारी झोपले की हा हळुच चढायचा, चांगले १ भांडे भरून दोघे मिळून प्यायचो.

मामा कधी कधी दुपारी झोपायचे तेंव्हा अम्हांला दुकानात येणारे कावळे हाकलायचे काम असायचे. पुन्हा आमची एक अट असायची : मामा उठल्यावर एक वडापाव पाहिजे. पण वडापाव कधी मिळायचाच नाही (मोठी माणसं कधीच दिलेला शब्द पाळत नाहित, आणि लहान्यांना शिकवतात सर्व. ). खुप वाटायचे मोठे व्हावे म्हणजे काही हवं ते करता येतं कोणी ओरडत सुद्धा नाही. पण काय करणार कोणी सांगायचेच नाही मोठे कसे होतात ते  खेळायला आम्हाला काहिही चालायचे. पाणी आणि माती तर माझे आवडते खेळ होते पण घरातल्यांना तर आम्हांला जे आवडायचे त्याच गोष्टिंचा राग यायचा (पण आम्ही बरे घाबरू त्यांना... ). रोज दुपारी मातीत पाणी ओतून वेगवेगळे आकाराच्या वस्तू बनवच्या.. खुपच मज्जा यायची. पण आजी उठायच्या आधी विहिरिवरून पाणी काढून स्वच्छ व्हायचे. पण आमच्या आनंदा वर विराजण टाकायला आजीची झोप उडलिच, आणि आम्ही तेव्हा नेमके विहिरिवर तडफडत होतो पाणी काढण्यासाठी. मग काय विचारता तिच्या भीतिने पाणी काढायची बादली विहिरिच्या पोटात गेली आणि आजिचे धपाटे आमच्या पाठित. वैताग आला होता नुसता.. मामा विहिरित पोहायचा ते चालेते यांना पण आम्ही प्रामाणिक पणे पाणी काढून हातपाय धुतो ते मात्र वाइट, काय वाटत असेल आमच्या मनाला.. पण आमचा विचार कोण करतो. 

असेच मग आम्ही शाळेत जायला लागलो. मला आजोबा फार आवडायचे. ते काधिच ओरडत नसत आणि छान गोष्टी सांगत, नवीन वस्तू आणून देत (ते हि न मागता : देवाने सर्वांना त्यांच्यासाखेच का नाही केले.. ) तर असे हे आजोबा नेहमी संध्याकाळी फिरायला जात पण तेंव्हा मात्र आम्हाला नेत नसत. एकदा ठरविलेच जायचेच ते कुठे जातात ते पहायला. आणि आजोबांना न सांगताच आणि कळुनही न देता त्यांच्या मागे मागे जायला लागले तर हे एका हॉटेल मध्येच गेले.. वा रे वा. घरी हॉटेल असताना दुसऱ्या हॉटेल मध्ये आं.. पण मी सुद्धा गेले त्यांच्या मागे मागे. ते ज्या टेबल वर बसले मी पण जाउन बसले त्यांच्यासमोर आणि आजोबा अशी हाक मारली मला वाटले ते घाबरतील, घरी सांगू नको म्हणतील  मग काहितरी वस्तू देण्याच्या आशेवर आपण मोठया मनाने त्यांना माफ करू पण कसले काय तेच मला ओरडायला लागले. सांगून येता येत नाही का, हरवली असतीस तर आणि बरेच काही. हि मोठी माणसं ना किल्लिच्या बाहुल्यासारखी असतात, एकदा चावी दिली कि सुरुच, ते बाहुले तरी थांबविता येते हो पण हि घरातली माणसे नाही हो नाही, त्यांना थांबविणे केवळ अशक्य! असो, तर मग थोड्या वेळाने ते शांत झाले आणि काहितरी मागविले. काय माहित आहे का, चक्क कॉफी!!!!!! आयुष्यात पहिल्यांदा कॉफी प्यायले. खुपच आवडली. मग कळाले ते तिथे का  गेले ते, अहो, आमच्या हॉटेल मध्ये नाही मिळायची!

माझी शाळा म्हणजे घरासमोरचा रस्ता ओलांडला कि शाळा. आजोबांनी शाळेत जायच्या आधिच सर्व शिकविले होते त्यामुळे मी हुशार होते आणि सर्वांची लाडकी पण. आमच्या घरी खुप प्रकारची फुले होती, मोगरा, अबोली, सोनटक्का, अनंत आणि बरिच. तर रोज आजोबा माझ्या बाईंसाठी गजरा करायचे (अहो, आजी साठी पण बरं का! ), मग तो मी मोठ्या अभिमानाने शाळेत घेऊन जात असे, बाई खुश! दादा नेहमी चिडवायचा गजरा घेऊन जातेस न म्हणून पहिला नंबर येतो, मग मी मोठे भोकाड पसरायचे हे सांगायलच नको.

पावसाळ्यात तर काय मज्जा असायची. गाऱांचा पाउस पडावा असे रोज वाटायचे पण लहान मुलांचे कोणिच ऐकत नाही पाऊस कुठून ऐकणार! तर माझी आई सोळा सोमवार करायची. आणि संध्याकाळी देवळात जायची, पण आम्हाला न्यायचे टाळत असे. आधिच उशिर त्यात आम्हचं लोढणं कसे काय नेणार ती. पण विचार करायचा नसतो म्हणून तर त्याला बालपण म्हणतात. तर एका सोमवारी आम्ही तिच्या मागेच लागलो. खुपच गोंधळ घातला. त्यामुळे आधिच उशिर झाला होता, ती तयार झाली न्यायला पण उचलून वगैरे नेणार नाही च्या आटिवर. आम्ही पण हो म्हटले आणि निघालो. पाउस पण पडत होता. आता कोकणातला पाउस वेगळा सांगायलाच नको. तर अशी आमची पालखी शंकराच्या देवळात गेली. मस्त प्रसाद खाल्ला, नमस्कार झाला, घंटा वाजविण्याचे काम पण झाले(मला देवळाचे वातावरण खुपच भावते.. किती छान वाटते ना तिथे. आणि सर्व कसं शांत असते, खुपच छान). आईला सर्व प्रश्न विचारून झाले, अर्धिच प्रदक्षिणा का मारायची, जास्वंदिचे फुल का नाही वहायचे. आणि बरेच काही. आई चे आमच्यामुळे देवळात कमी आणि आमच्याकडे जास्त लक्ष होते. असा आईची पूजा आणि आमच धुडगुस संपल्यावर आम्ही बाहेर आलो तर काय पाउस खुपच पडत होता आणि अंधार पण वाढला होता. आई घाबरली. आम्हा दोन लहांग्यांची काळजी बिचारिला! मंदिर खूपच दूर होते आणि लोक पण नव्हते, मग काय आम्हाला घेऊन बिचारी पळत सुटली आणि ओरडायला लागली (यांना ओरडायचे सांगायलाच नको.. किल्ली आपोआपच लागते. इजिंनिअरिंगच्या भाषेत सेल्फ रनिंग प्रोग्राम)तरी सांगत होते येउ नका येऊ नका, धावा आता जोरात. रस्ता पण तसा खडकाळच होता, आम्ही पडत होतो, धावत होतो. माझे भोकाड सुरू झाले होते ते काही सांगायलाच नको. आपली आई एवढी क्रुर का झाली एवढे रडत आहे पडून लागत आहे पण हि आपली ओरडतेच आहे. शेवटी घरी आलो आणि मग काय हक्काचे माणुस (आजोबा) भेटल्यावर अजुनच गोंधळ, आई-आजी ओरडत होत्या आणि त्यांचा ओरडा ऐकू येऊ नये म्हणून मी दुप्पट जोरात आवाजात रडत होते. पुन्हा शंकराच्या त्या देवळात काही गेले नाही.

आता फक्त ते दिवसच आठवायचे (कारण आता लाड करायला आजी-आजोबा नाहित, ). मोठे झाल्यावर मज्जा असते हे खर आहे पण लहानपणी जे मिळाले ते मोठेपणी मागुनही मिळणार नाही. अहो काय म्हणून काय विचारता : आजी- आजोबां चे प्रेम, आई-बाबांचे प्रेमाने जवळ घेणे, जे लहानपणी नेहमिच असायचे ते अता खुप दिवसांनी किंवा महिन्यांनी होतय. त्यानी केलेले संस्कार, त्यांनी घेतलेली काळजी. कारण मोठे झाल्यवर ते अजून मोठे होऊन निघून जातात पण जाताना त्यांचे प्रेम इतके देऊन जातात कि ते आयुष्यभर पुरते. नशिबवान असतो आपण म्हणून आजी-आजोबा असतात. एवढेच सांगावेसे वाटते लहान मुलांना नेहमी आजी-आजोबांचा सहवास लाभू देत. त्यांनी दिलेले प्रेम कोणिही देऊ शकत नाही.