जगातलं सगळ्यात अवघड कोडं

सगळ्या जगात हे कोडं आइन्स्टाइनचं कोडं Einstein's Riddle म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने म्हणे खूप लहान असताना हे रचलं होतं. तन्वीर मणियार नावाच्या माझ्या एका सहकाऱ्याने आमच्या कार्यालयाच्या ब्लॉगवर टाकलं होतं. तन्वीरचे आभार मानून हे कोडं मनोगतींच्या डोक्याला खाऊ म्हणून देत आहे.

१. पाच घरे आहेत.

२. ब्रिटिश मनुष्य लाल घरात राहतो.

३. स्पॅनिश माणसाकडे कुत्रा आहे.

४. हिरव्या घरात कॉफी प्यायली जाते.

५. युक्रेनिअन माणूस चहा पितो.

६. हिरवे घर पांढऱ्या घराच्या लगेच शेजारी उजवीकडे आहे.

७. जो माणूस ओल्ड गोल्ड सिगार ओढतो त्याने गोगलगायी पाळलेल्या आहेत.

८. पिवळ्या घरात कूल्स सिगार ओढली जाते.

९. मधल्या घरात दूध प्यायले जाते.

१०. पहिल्या घरात नॉर्वेचा माणूस राहतो.

११. चेस्टरफील्ड्स सिगार ओढणारा मनुष्य कोल्हा पाळणाऱ्याच्या लगेच शेजारी राहतो.

१२. घोडा पाळणाऱ्याच्या लगेचच्या शेजारच्या घरात कूल्स सिगार ओढली जाते.

१३. लकी स्ट्राइक सिगार ओढणारा मनुष्य संत्र्याचा रस पितो.

१४. जपानी मनुष्य पार्लिआमेंट सिगार ओढतो.

१५. नॉर्वेचा मनुष्य निळ्या घराच्या लगेचच शेजारी राहतो.

आता सांगा, पाणी कोण पितो? झेब्रा कोणाकडे आहे?

सहज जाता सांगायला हरकत नाही, या प्रत्येक घराचा रंग वेगवेगळा, त्यांचे मालक वेगवेगळ्या देशाचे, त्यांच्याकडील पाळीव प्राणी वेगवेगळे, त्यांच्या सिगार वेगवेगळ्या, ते पितात ती पेये वेगवेगळी, असा मामला आहे.

टीप : वाक्य क्र. ६ मध्ये उजवीकडे म्हणजे तुमच्या उजवीकडे.