बोधकथा २ - भाग १

दिवसेंदिवस ऋतुचक्राची अनियमितता आंधळ्यालाही ऐकू येईल आणि बहिऱ्यालाही दिसेल इतकी ठळक होऊ लागली होती. सर्वच प्राण्या-पक्ष्यांना त्याचा त्रास जाणवू लागला होता.

वसंत ऋतू येण्याची चाहूल लागताच कोकिळेने गायला घ्यावे आणि पावसाची अकाली सर येऊन तिचा सायनस बळावावा, वर्षा ऋतू येण्याची चाहूल लागताच मोराने पिसारा फुलवून नाचायला घ्यावे आणि अचानक करडे ढग पळून जाऊन परत तपत्या झळा (उन्हाच्या) झेलीत त्याचा पार्श्वभाग शेकून निघावा, दिवाळी उरकताच आता थंडी येईल म्हणून गायीने झोपताना गोऱ्ह्याला पोटाशी घ्यावे आणि उबाट्याने वैतागून त्याने तिला शिंगलावे असे फार होऊ लागले होते.

मानवप्राण्यालाही याचा त्रास होतच होता. पावसाळा संपला म्हणून ऑक्टोबरमध्ये बांधकामे करायला घ्यावीत तर दण्ण्या पाऊस येऊन बिल्डर लोकांची चांदी (पैशांची) होण्याऐवजी चांदी (डोईवरल्या केसांची) व्हावी. थंडी असेल म्हणून प्रियेसाठी शाल घेऊन 'सवाई गंधर्व'ला जावे तर तिने त्याऐवजी घाम पुसायला टॉवेल का नाही आणला असे त्रासिक स्वरात विचारावे. एप्रिलमध्ये उन्हाचा कडाका म्हणून बॉसच्या बायकोला 'अमृत कोकम'चा कॅन नेऊन द्यावा (आमच्या घरचे हो, या ना एकदा आमच्या घरी कोंकणात. स्वतःच पाहा कोकमसाले कशी करतात ते) तर ती अकाली आलेल्या पावसात भिजल्यामुळे शिंकत बसलेली असावी आणि तिच्या Nutrition Consultantने कुठलाही आंबट पदार्थ सर्दीला वाईट असे ठासून सांगितलेले असावे.

पण प्राण्या-पक्ष्यांना होणारा त्रास जास्त होता. कारण त्यात मानवांकडून होणाऱ्या त्रासाची भर पडली होती. स्वतःची संख्या प्रमाणाबाहेर वाढवून माणसांनी नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा उपसा तर सुरू केला होताच, पण ऊर्जास्त्रोत नुसते वापरण्यापेक्षा त्यांची नासधूस करण्यात त्यांना जास्त रस दिसत होता. आता हे करताना त्यांचा डोळा प्राण्या-पक्ष्यांच्या अधिवासांकडे वळला यात नवल नाही. प्राणीपक्षी मारले तर अन्नाचा प्रश्न सुटतो, आणि जागाही मोकळी होते हा दुहेरी फायदा पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले.

मग मॉरिशसमधले डोडो, भारतातले चित्ते, न्यूझीलंडमधली हसरी घुबडे अशा एकेक जमाती नष्ट होऊ लागल्या होत्या. सैबेरियातून येणारे क्रौंच पक्षी त्या यादीत घुसवण्यासाठी अफगाणी पठाण कामाला लागले होते. चिंकारा हरीण या यादीत घुसवण्यासाठी काही भारतीय 'तारे' (सतीश तारे, तुमचा काही संबंध नाही इथे. गैरसमज नसावा) सरसावले होते.

अशा वेळेला,  भारतातल्या का होईना,  सगळ्या प्राणी-पक्ष्यांनी मिळून एकीचे बळ वापरावे आणि यावर काही तोडगा काढावा असा विचार एका सिंहाच्या मनात आला. त्याने लगेच प्राण्या-पक्ष्यांच्या डेटाबेसमधून पत्ते मिळवून सर्वांना ईमेल्स सटकावल्या. पण बैठकीची वेळ आली तेव्हा तिथे फक्त एक म्हातारा कोल्हा, एक वाघाचा बछडा, एक गाढव आणि एक लालतोंडे माकड एवढेच होते. सिंहाला आश्चर्य वाटले. पण माकडाने जांभया देत खुलासा केला. "९९ टक्के लोकांच्या 'स्पॅम' फोल्डरमध्ये गेली तुझी मेल. या कोल्ह्याला रिटायर झाल्यापासून वेळ जात नाही म्हणून तो सगळ्या मेल्स मन लावून वाचत बसतो. अगदी "I found you a new job" किंवा "Girls for dating" असल्या मेल्सही वाचतो नि उगाचच एक्साइट होतो. तुझा ईमेल अकाऊंटचा पासवर्ड वाघाने क्रॅक केलाय. तुमची जुनी दुश्मनी ना, राजा कोण यावरून?  तुझ्या "Sent mail" मधली मेल वाचून वाघाने आपल्या बछड्याला पाठवलंय इथे काय होतंय त्याचा रिपोर्ट द्यायला.  या गाढवाला कुणीतरी सांगितलंय की इथे फुकट जेवण आहे. त्याला माणसांच्या सभांची सवय आहे, कारण दुसऱ्याच्या सभेत याला खिंकाळत घुसवण्यासाठी याचा मालक पैसे घेतो मोजून.  आणि दोन वा जास्त प्राणी-पक्षी एकत्र आले की तिथे घुसून गंमत पाहायची ही आम्हां माकडांची अंगभूत वृत्ती. म्हणून मी आलो. "

"आता करायचं काय मग? " सिंह हताश स्वरात म्हणाला.

"काळजी करू नकोस.  जगावर दूरगामी परिणाम घडवणाऱ्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशीच निराशाजनक होते. संघटना बांधणे म्हणजे एक अत्यंत संथ प्रक्रिया आहे. पण धीर सोडायचा नाही. अंतिम विजय आपलाच आहे. क्रांती चिरायू होवो" कोल्हा म्हणाला.

"संभाळून रे बाबा. आयुष्यभर लाल निशाण पक्षात घालवलंय त्याने, त्यामुळे 'अंतिम विजय' वगैरे भानगडी स्वप्नात येतात त्याच्या कायम. पण प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या मुलाशी भिकार-सावकार खेळतानाही कधी याला विजय मिळाला नाही. त्याची मुलगी 'हो मी बूर्ज्वा आहे' असे त्याला तोंडावर ठणकावून सिनेमात काम करायला निघून गेली. तेव्हा याचा सल्ला जरा जपूनच घे".

"See, uncle, तुम्हांला काय achieve करायचं आहे? जरा think करा नि tell. आपला approach कसा professional पाहिजे.  Management त्यालाच तर म्हणतात.  Just तुमचे points list down करा आणि मग let's have a discussion.  Don't worry, everything will fall in place then"  इति व्याघ्रबछडा.

"ह्याच्यापासूनही सावध राहा रे. हा त्या रेड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीतून एम बी ए करून आलाय आणि तेव्हापासून सर्व जगाची मॅनेजमेंट आपण चुटकीसरशी करू असे त्याचे ठाम मत झाले आहे. एम बी ए म्हणजे मॅनेजमेंट बाय ऍक्सिडेंट हे त्याला सांगितले नाहीये कुणी अजून. बाकी वाघाच्या शहाणपणाला मानायला हवं बरं का. मुलाला एम बी ए ला पाठवले, पण परतल्यावर त्याला काम मात्र काहीही दिले नाही. "

हताश होऊन सिंहाने परत भेटायची वेळ दुसऱ्या ईमेलने कळवतो असे जाहीर केले आणि माकडाला बरोबर घेऊन तो घरी गेला.

माकडाने सल्लागाराची भूमिका मन लावून पार पाडायला सुरुवात केली. सर्वप्रथम म्हणजे त्याने सिंहाला त्याच्या ईमेल अकाऊंटचा पासवर्ड बदलून दिला. ईमेल म्हणजे पत्र पाठवण्याचाच एक अतीकिचकट प्रकार असे सिंहाचे मत होते, ते माकडाने त्याला बदलायला लावले. सर्व प्राण्या-पक्ष्यांना पाठवायच्या ईमेलच्या मसुद्याचा त्याने अंतर्बाह्य पालट केला. United we stand, divided we fall असा मथळा देऊन त्याने किती प्राणी-पक्षी नामशेष झाले आहेत, आणि मानवाने किती जंगलांवर आक्रमण केले आहे हे वेगवेगळ्या ग्राफ्स आणि टेबलांचा वापर करून एका पीडीएफ डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित मांडले. 'ही सगळी आकडेवारी खरी आहे का? ' या सिंहाच्या प्रश्नाला त्याने "काय फरक पडतो" असे उडवून लावले.

आपल्या ग्रुपला नाव हवे अशी भुणभूण लावून त्याने सिंहाला "प्राणी पक्षी पार्टी" ऊर्फ पीपीपी या नावावर राजी केले. तो म्हणाला, "आपली गाठ भारतातल्या राज्यकर्त्यांशी आहे.  पीपीपी हे आपल्या शेजारच्या देशातल्या एका पार्टीचे नाव आहे, आणि त्या देशातल्या प्रत्येक गोष्टीला इथले राज्यकर्ते टरकून असतात. या पीपीपी नावामुळे आपल्याला काँग्रेस, समाजवादी, जनता दल, राष्ट्रवादी अशा 'सेक्युलर' पक्षांचा (म्हणजे राजकीय पक्षांचा, उडणाऱ्या पक्ष्यांचा नव्हे) पाठिंबा मिळेल. "

आणि आता सर्वांना बोलावायचे ते 'बैठकी'करता नव्हे, तर 'महाअधिवेशना'साठी असेही त्याने जाहीर केले. आणि जंगलाच्या मधोमध असणाऱ्या डोंगरावरचे विस्तीर्ण पठार ही जागा निश्चित केली. "एवढी मोठी जागा कशाला? मागच्या वेळेला पाच डोकी होती, आता पंचवीस होतील फारतर" या सिंहाच्या शंकेला त्याने हिंग लावून विचारले नाही.  "तू तुझ्या भाषणाची तयारी कर. आयाळीला जरा स्टायलिशपणे झटका देण्याची सवय कर. चावट विनोद पेर. मध्येच पंजा उंचावून त्यातले एक बोट आभाळाकडे रोख.  आणि लक्षात ठेव, तुझी गर्जना ही तुझी ओळख आहे. त्यामुळे मधूनअधून बेंबीच्या देठापासून डरकाळ्या मार. धमक्या दे. 'ही असली औलाद कापून काढावी लागेल' असे गुरगुरत जाहीर कर. डरकाळ्या, धमक्या आणि चावट विनोद याखेरीज तुझ्या भाषणात काय आहे याकडे कुणाचेही लक्ष असणार नाहीये एवढे तू लक्षात ठेव. 'पेटून उठा', 'कानाखाली आवाज काढा' असे संदेश भाषणाच्या शेवटी द्यायला विसरू नकोस. "

महाअधिवेशनाचे स्टेज माकडाने स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले. त्यावर एक सर्वात उंच आसन होते. मग त्याखालोखालच्या उंचीची तीन आसने होती. बाकी सगळ्यांना खाली. स्टेजच्या मागच्या बाजूला वटवाघळाचा मोठ्ठा कट-आऊट होता (प्राणी-पक्षी समन्वयाचे प्रतीक). सभेची सूत्रेही त्याने आपल्याच हातात ठेवली.

सभेला अमाप गर्दी लोटली होती.

आपल्याला वेळेत पोचायला जमणार नाही म्हणून कासव आणि गोगलगायीने मिळून एकदंत ट्रॅव्हल्समधून एक हत्ती घेतला. पण गोगलगायीला हत्तीच्या पाठीवर कसे न्यायचे हा प्रश्न काही सुटला नाही. सोंडेवरून कासव कसेबसे चढले वर, पण गोगलगाय सटकून पडू लागली. आणि हत्तीने सोंडेने तिला उचलायचा प्रयत्न केला तर ती त्याच्या सोंडेच्या पकडीत येईना. पण सभेला जायची इच्छा इतकी तीव्र होती, की एकदंत ट्रॅव्हल्सला दिलेली आगाऊ रक्कम अक्कलखाती जमा घालून दोघांनी गरुडा एअरवेजची टू-सीटर फ्लाईटच चार्टर केली.

निपुत्रिक असलेल्या आणि मृत्यूपंथाला लागलेल्या घुबडाला खरेतर त्याचे मृत्यूपत्र करायचे होते. कावळे वकील या सभेला यायला निघाले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर प्रवास करतानाच काय ते बोलावे असे योजून त्याने घारे टूरिस्टसच्या लिमोझीन सर्व्हिसमध्ये नाव नोंदवले. "अचानक दर दुप्पट कसे झाले? " या त्याच्या पृच्छेला उत्तर मिळाले की कावळे वकिलांनी त्यांचे तिकीटही याच्याच अकाउंटमध्ये मांडायला सांगितले होते.

सभेची सुरुवात एकदम झोकात झाली. हत्तींनी सोंडा उंचावून तुतारी फुंकली. मग कावळ्यांच्या घोषपथकाच्या साथीने हत्तींनी संचलन केले. मग कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सैबेरियन क्रौंच पक्ष्यांच्या एका तुकडीने हवाई संचलन केले.   त्यांना या मेळाव्याची (चुकलो,  'महाअधिवेशनाची') बातमी कुणी दिली कोण जाणे.