गेल्या शतकातील ज्ञात-अज्ञात समाज सुधारकांना आदरांजली
नवशतकाच्या उंबरठ्यावर,
प्रणाम करूनी गतशतकाला,
जरा स्मरू या त्या दधिचींना,
रचिला ज्यांनी समाज पाया !
शिल्प निर्मिले सुंदर त्यांनी,
निजदेहाची करुनी छन्नी !
परदुःखास्तव झिजले कणकण,
पर-सुखातच त्यांचे मीपण!
पददलितांच्या दुःख कळांनी,
विकल-विव्हलता यांचे हृदयी!
प्रश्नांसाठी सर्स्वस्व देता,
उत्तर येई सहजी हाता!
काय असावे, कसे घडावे?
चिंतनमात्रे सहज स्फुरावे!
अर्थ मिळतसे, त्या यत्नांना.
नव्हत्या केवळ व्यर्थ वल्गना!
स्पष्टच होत्या विचार-कल्पना,
'ध्येय गाठणे' उच्च-भावना!
स्तुती-निंदेचे वादळ उठले,
विचलित त्यांचे मन ना झाले!
कळली नव्हती किंमात कोणा,
मूढ अशा त्या समकाळाला!
द्रष्टे जरी ते आज भासती,
उपहासची तेव्हा सदा संगती!
नतमस्तक मी त्यांच्या पुढती,
ज्योतीसम जे वाट दाविती,
त्याच दिशेने, त्या वाटेवर,
पडेल का हो माझे पाऊल?
धडपडणारे असे दधिची,
आम्हा लाभू द्या जन्मोजन्मी!
कृतज्ञता त्यांच्या चरणी वाहू!
धूळ तयांची माथी मिरव
----------------------------
टीप- दधिची हे एक पुराणकालीन ऋषी होऊन गेले; वृत्रसूराला ठार मारण्यासाठी त्यांच्या हाडांचे अस्त्र(वज्र) करायचे होते, म्हणून त्यांनी जिवंतपणीच आपल्या देहाचा त्याग केला आणि इंद्रास आपली हाडे उपलब्ध करून दिली. त्यांचा हा त्याग अलौकिक मानला जातो!