कुजबूज उठते अशी गोकुळी
रीत मुळी तिज उमगत नाही
लता-वेली त्या गूज सांगती
कृष्णसखी ही राधा होई ।
सांग कशी समजावू त्यांना
प्रीतीची ही रीत आगळी
कालींदीच्या तटी रंगल्या
रासरंगांची कहाणी ।
नुरले आता माझे काही
चित्ती तुझीच मूर्त सावळी
यमुनेच्या त्या लहरींसंगे
राधा ही होतसे बावरी ।
उमलून येई आर्त काही
मंतरलेल्या सुरांमधुनी
धुंद, मधुर त्या तालावरती
झुलते मोरपीस ते बाई ।
किणकिणती लाजरी कंकणे
आणि बोलती पैंजण पायी
कृष्णा तुझ्या बासरीला तो
बंध कसा रे नाही ।