बसचा प्रवास

बसचा प्रवास - थडथडणारा!
बसचा प्रवास - खडखडणारा!
बसचा प्रवास - कंटाळवाणा!
बसचा प्रवास - जीवघेणा!

बसचा प्रवास - वेड लावणारी हुरहुर !
बसचा प्रवास - पावसाची भुरभुर!
बसचा प्रवास - सरींच्या लाटा!
बसचा प्रवास - चिंब मन चिंब वाटा!

बसची खिडकी - लाजेपुरती!
बस- मध्यमवर्गीय मनोव्रुत्ती!
बस- आठ्वणींच्या धारा!
बस- उकडणारा वारा!

बसमध्ये थोडी सोय गैरसोय थोडी!
गोंधळ शिव्या - थोडी लाडीगोडी!
पोर, भाज्या, टोपल्या खोकी,
धोतर, पदर, दुपट्यातली डोकी!

बस कधी भरधाव वेगात
कधी रांगत-थांबत,
बस म्हणजे एक गाव,
चाळीस  लोकांच स्वगत,

पाच तासांचा प्रवास
होतो डोळ्यात आणून प्राण...
ओळखीचे रस्ते दिसण्यासाठी
जीव पडतो गहाण...

बस आपली चालत असते पोळणार्या उन्हातून ,
कोसळत्या पावसातून-सुस्तावलेल्या दिवसातून,
बसमध्ये जागा ऐसपैस असते,
"ट्रव्हल" सारखी "प्राय्व्हेट स्पेस" नसते...

गावात शिरली की गलका होतो,
प्रवाश्यांचा जीव अर्धा होतो..
मुकाम येताच प्रवासी उतरतात,
बसची रबरी चाक थंडावा घेतात..

ड्राय्व्हर पुन्हा एकदा  स्टेअरिंग फिरवतो,
इंजीन गुरगुरत.. मुक्कम संपतो!!