शीर्षक वाचून बुचकळ्यात पडले ना! ह्या 'बा' शी तुमचा पाला पडला नसेल तर उत्तमच. आयुष्यात कधी अश्या 'बा'शी पाला पडू नये म्हणून प्रार्थना करा.
अरे हो, हे सग्गळं ठीक आहे, करू आम्ही प्रार्थना पण ही आधी 'बा' कोण आहे ते तर सांगा. नुकताच कुठे केकता कपूरच्या 'बा'ने पिच्छा सोडला असला तरी 'बा'च नक्की वय काय असेल हे कोडं अद्यापही सुटलेलं नाही. भरीस भर आणखी तुमचं हे कोडं.
जास्त तुमचं डोकं शिणवत नाही. ही 'बा' म्हणजे बॉसची बायको! तिकडे हापिसात 'बॉ' नि नवऱ्याला आणि इकडे ह्या 'बा'नि आणलाय वैताग! केलंय हैराण! त्याचं असं झालं मागच्या वर्षी 'बा' दिल्लीहून इथे आली तेव्हा आमचं महिला मंडळ होतं मुर्छितावस्थेत. आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी अमृत घेऊन ही 'बा' देवदूत बनून येणार हे कळल्याबरोबर मिसेज सिन्हा, मिसेज गुप्ता, मिसेज बोस व मिसेज शर्मांची लगबग सुरू झाली.
कशासाठी?
कशासाठी म्हणजे काय, छाप मारण्यासाठी. छाप म्हणजे कळ्ळलं ना,शुद्ध मराठीत इम्प्रेस करण्यासाठी! आणि हो, ही लगबग केव्हा स्पर्धा झाली बिचाऱ्यांना कळ्ळलंच नाही. मी बापडी ना लगबगीत होते ना स्पर्धेत. ह्या 'बा'शी आपला काही फारसा संबंध नाही. ती चौकडी आणि ती 'बा' घालू देत गोंधळ आपण गंमत पाहू ह्या थाटात आणि पाण्यात राहून माश्याशी वैर नको म्हणत मंडळात प्रवेश करती झाले. तोपर्यंत 'बा' बहोत अच्छी, बहोत पढीलिखी, बहोत मिलनसार अशी बहोत बहोत विशेषणं प्रत्येक सदस्यांच्या कानावर पोचती करण्यात आली होती. दरमहिन्याला वेगवेगळे कार्यक्रम, समाजसेवा, प्रत्येकीतल्या सुप्त गुणांना व विचारांना वाव देण्यात येईल इत्यादी इत्यादी घोषणा करून झाल्या. तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन! नवीन काही नाही पण आम्ही ह्या क्षेत्रात नवखे आहोत ना! थोड्याच दिवसात प्रत्येकीतले सुप्त गुण असे काही बाहेर पडायला लागले की विचारूच नका. आम्ही तर तोंडातच बोटं घातली. चेहऱ्यावरची माशी न हालणारी ती मलहोत्रा अशी काही नाचू लागली जणू काही माधुरी दीक्षितच.
झा SSS लं मग काय! बाकीच्या सगळ्याजणी हम भी कुछ कमी नही म्हणत 'गुण' उधळू लागल्या. आम्ही बापुडे पडलो बॅक आर्टिस्ट. पण एका कुदिनी अंगात मराठीबाणा संचारला अन पायावर धोंडा पाडून घेतला. धोंडा पायावर पडला अन हात कपाळावर. तो कपाळावर गेलेला हात अजून खाली आलाच नाही.
केवढं मोठं प्रश्नचिह्न आहे तुमच्या चेहऱ्यावर. सांगते काय झालं ते. निमित्त होतं महिलादिनाचं. प्रत्येकीनं काही ना काही सादरीकरण/व्यक्त करायचं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या आनंदी जोशी व सावित्रीबाई फुले ह्या दोन आदर्श महिलांच चरित्र थोडक्यात सांगितलं अन घात झाला.
आता तुम्ही म्हणाल घात तो काय झाला!
अहो, 'बा' चा झाला नं गोड गैरसमज की आम्ही अनेक कला पारंगत असल्याचा! एक दिवस योगाप्रशिक्षण दे, तर एखादा कुकरी शो घे.... इथपर्यंत ठीक होतं हो. पण एका कार्यक्रमासाठी गाणाऱ्यांच्या यादीत नाव टाकलं तेव्हा तर हसावं की रडावं कळेचना. गाणं म्हणून आपलं होणार होतं हसं आणि ऐकणाऱ्यांचं रडं. 'देवा मला वाचव' अशी आर्त आळवणी केली. देव प्रसन्न झाला आणि आम्ही पडलो आजारी. सुटकेचा निःश्वास टाकला. आजच मरण उद्यावर ढकलल्या गेलं होतं.असं होता होता संक्रांत उजाडली आणि ही संक्रांत आमच्यावर येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक दिवस फर्मान निघालं मराठी पद्धतीने साजरी होणार.
तुम्ही म्हणाल त्यात काय मोठं! दरवर्षीच तर करतो हळदीकुंकू. आजकाल बायकांना कशाचंही टेन्शन घ्यायची सवयच झाली आहे.
तुम्हाला माहित नाहीये. इथे काही सोप्प नाहीये. वाणाच सामान आणलं, तिळाच्या लाडू-वड्या करून झाल्या, हलवा, हलव्याचे दागिने आणले, कार्यक्रमाची पत्रिका केली, पत्रिकेत ड्रेस कोड टाकला. कोणता टाकला असेल?
अर्थात काळा नो डाऊट!
अगदी चूक! हातात पत्रिका आली त्यात काळ्याबरोबर हराही होता. हरा घाला नाहीतर पीला. जाऊ दे म्हणत पुढच्या तयारीला लागलो. पुढची तयारी म्हणजे सगळ्यात कठीण! मांजरीच्या गळ्यात घंटा बांधेल कोण? 'बा'ला नऊवारी नेसवणार कोण? आम्हाला येतच नाही ह्या सबबीवर सुटका करून घेतली. आलीया भोगासी म्हणत कुलकर्णीन व देशपांडीण बाई सामोरी गेल्या. लोहडी/हळदीकुंकू असा फ्युजन कार्यक्रम यथासांग पार पडला. आम्ही परत एकदा दीर्घ निःश्वास टाकला. ऐकुन तुम्ही पण रिलॅक्स झाल्या नं! पण ष्टोरी इथे संपत नाहीये. आम्ही आतुरतेने ज्या फोनची वाट पाहत होता तो अखेर खणखणला! शेक्रेटरीबाईंचा फोन होता. आमचे कान आतुर झाले होते कवतिक ऐकायला. नमनाला घडाभर तेल घालून झाले कवतिक सोडाच उलट आडून-आडून सांगून झाले की आम्हीच 'बा'ला कार्यक्रम छान झालाय हे नकळवायची चूक केली होती.गेला ना आता तुमचाही हात कपाळावर! हा जो शेक्रेटरीबाईंचा फोन होता ना तो फोनगोष्टीखेळातला फोन होता. हा जो खेळ खेळतात ना त्याला म्हणतात 'फोनगोष्टीचा खेळ'. तुम्ही लहानपणी खेळला असाल नं कानगोष्टीचा खेळ त्याच्या अगदी विरुद्ध हा खेळ खेळला जातो. कानगोष्टीत पहिला दुसऱ्याच्या कानात काहीतरी सांगतो दुसऱ्याला त्याला जे ऐकायला येईल तसं तिसऱ्याला... शेवटचा खेळाडू जे सांगतो व पहिल्याने जे सांगितले ते ऐकून सगळेच हसतात. पण ह्या खेळात मात्र ...... फोनगोष्टीखेळाची सुरुवात 'बा' पासून होते आणि 'बा'वरच संपते आणि तेही अचूक! अर्थात ह्या खेळाचा अखेर केला आम्ही! पण आमची कुवत पडली फारच कमी. क्लास लावावा म्हणतो आम्ही. कौतुक करणे ही एक कला आहे. कोणी घेता का क्लास? घेता का कुणी क्लास?