गुढी पाडवा

संपली पानगळ, संपला शिशिर,
अन संपली ती गर्द अवस,
नवसुमने फुलवीत आला,
वर्षाचा हा पहिला दिवस |

ढग सारून येणारी ती,
तेजोनिधिची नाजूक बोटे,
ललत चढवीत स्वर त्या बोटांवर,
गळल्या पाना दरीत लोटे |

मातीचा मुग्ध सुगंध उधळीत,
अंगणे भिजविती गोल सडे,
मग त्या मातीला रंग चढवुनी,
वसंत आनंद चोहींकडे |

दारोदारीच्या गुढ्या सजविती,
चैत्रातील शेंदूर फुले,
गाठी गळ्यात मिरवितं फिरती,
घरोघरीची बाल्यफुले |

प्रसाद देव गुढीचा अन,
जिव्हेला जसा स्पर्श घडे,
गतवर्षीच्या दुख:क्लेशाचा,
निमिषातच तसा विसर पडे |

नवा रंग, नवा सुगंध,
नवा अभंग, देऊळी घुमे,
पांगुळल्या क्षीणल्या मनाला,
नवा अर्थ, नवी दिशा गमे |

अनुबंध