बोधकथा - ३

बघता बघता थंडी झपाट्याने नाहीशी झाली. उन्हाचा कडाका वाढायला लागला. पाने गळालेली झाडे सत्ता गेलेल्या राजकारण्यांसारखी केविलवाणी दिसू लागली. कोकिळांनी आपला घसा साफ करायला घेतला. उन्हाळा आला की पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार, आणि पर्यायाने आपल्याला पाण्याच्या खेपा चांगल्याच वाढणार या विचाराने ठिकठिकाणच्या गाढवांचे चेहरे उतरले. उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची झुंबड उडेल, आणि त्यांचे आचरट चाळे बघून आपली करमणूक होईल या विचाराने ठिकठिकाणच्या अभयारण्यातले प्राणी हुशारले. उन्हाळा संपल्यासंपल्या करायचे वर्षा-नृत्य शिकण्यासाठी 'मयूर क्लासेस'मध्ये तरुण मोरांची झुंबड उडाली.

कावळ्यांना नेहमीच उन्हाळ्याचा त्रास होई. काळ्या रंगामुळे त्यांच्यात उष्माघाताचे प्रमाण खूप होते. आणि उन्हाळ्यापाठोपाठ येणाऱ्या पावसाळ्यात त्यांना मोठ्या झाडांच्या फांद्यांवर आणि ढोल्यांमध्ये आश्रय घ्यावा लागे. शिवाय भक्ष्य मिळवायला चांगलाच त्रास पडे.

पण गेली काही वर्षे कावळ्यांच्यात एक पुढारी तयार होत होता. जंगल पंचायतीच्या निवडणुकीत त्याने हळूहळू आपला जम बसवायला घेतला होता. एकदा तर अडेलतट्टू खेचरे, बिलंदर माकडे आणि लठ्ठ-मठ्ठ हत्ती यांची युती करून त्याने स्वतःला पंचायतप्रमुख करून घेतले होते. मात्र त्यानंतर त्याने आपले लक्ष राष्ट्रीय पातळीवर केंद्रित केले.

कावळा पुरोगामी होता, त्यामुळे एक अंडे उबवल्यावर जे पिल्लू आले ते ठेवून बाकीची अंडी त्याने सरळ फोडून टाकली होती. आणि नंतर तर डॉ वाघमाऱ्यांकडे जाऊन त्याने एक विशिष्ट शस्त्रक्रिया करून घेतली होती, ज्यायोगे अंडी फोडून टाकण्याचा त्रास वाचला होता. पहिले पिल्लू मादी होती. जंगलातल्या पितृसत्ताक पद्धतीत आपल्या मुलीला पुढे आणणे सोयिस्कर नाही हे त्याला कळले होते. त्यामुळे त्याने मुलीचे लग्न लावून दिले, नवीन घरटे करायला तिला पूर्वेकडे धाडले. आणि आपल्या पुतण्याला जंगलपातळीवर तयार करायला घेतले.

आता जंगल पंचायतीच्या निवडणुका पुढच्याच वर्षी येऊ घातल्या होत्या, आणि कावळा राजकीय हिशेब करायला (आणि मिटवायला) बसला होता. आपण कितीही प्रशिक्षण दिले, तरी भडक डोक्याचा आपल्या पुतण्या सुधारणे जवळपास अशक्य आहे हे त्याला कळत होते. हौसेने लग्न लावून पाठवलेली आपली मुलगी नवऱ्यासकट परत आपल्याच गळ्यात आली आहे हेही त्याला कळत होते. आत्ताच्या निवडणुका अवघड आहेत हेही त्याला कळत होते. आणि पावसाळ्यात कावळ्यांचा (म्हणजे, आपल्या पाठिराख्या कावळ्यांचा) अन्नप्रश्न सोडवायला हवा हेही त्याला कळत होते.

तो चौफेर नजर असलेला दूरदर्शी नेता म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याने हे चार प्रश्न सरधोपट पद्धतीने अनुक्रमे न सोडवता त्यांचा गुंता केला. प्रश्न क्र १ आणि ३ त्याने एकत्र सोडवला. निवडणुकीचे सगळेच कंत्राट त्याने आपल्या पुतण्याला दिले. म्हणजे हरला तर त्याला डच्चू द्यायला बरे, आणि जिंकला तर "जगाला त्याचा भडकपणा दिसतो, पण मला त्याच्यातले सुप्त गुण दिसले" म्हणायला बरे. आता प्रश्न क्र २ आणि ४ यांची सांगड कशी घालावी याचा तो विचार करू लागला.

विचार करताना त्याचे टरके डोळे जमिनीच्या दिशेने वळले. खाली कष्टकऱ्या मुंग्यांची एक रांग "रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग" या ओळी आपल्यावरच बेतल्या आहेत अशा आवेशात उंदरांचे एक बीळ पोखरून त्यातल्या जोंधळ्याचा एकेक दाणा डोक्यावर धरून आपल्या बिळाकडे चालली होती. कावळ्याने परत वर पाहिले, नजर दुसरीकडे लावली, आणि तिसरीकडे बसलेल्या त्याच्या पित्त्याला प्रश्न केला "आनंदा, मला पटेल असे उत्तर दे. तू कधी धान्य खाल्ले आहेस का? की कायम किडे-अळ्या? "

आनंद पटेल असे उत्तर देण्यात वाकबगार होता. शेवटी तोही कावळ्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर गेला होता. त्याने एकदम प्रामाणिकपणाचा सूर लावला. "खोटं कशापायी बोलू सायेब, पावसाळ्यात चाचार दिस भायेर पडाया गावत न्हाई, तवा येळंला गवताचं बी खाऊन जगलोया. पन घऊ-जुंदळं गावलं तर चंगळ होतीया बगा". कावळ्याने नजर चौथीकडे नेली आणि मान डोलावली.

त्यानंतर जंगलात एकच धमाल सुरू झाली. कावळ्याच्या मुलीने तिची पिल्ले (ती आणि तिचा नवरा पुरोगामी नव्हते, त्यामुळे अनेकवचन) तिच्या नवऱ्याकडे सोपवली, आणि विलोभनीय दृष्य असलेल्या तळ्याकाठच्या आपल्या घरट्यात त्या सर्वांना सोडून ती पपांच्या सांगण्याप्रमाणे कामाला लागली.

आपण मिळून अतिशय शिस्तबद्ध रीतीने करत असलेले काम हिच्या देखरेखीखाली कशाला करायचे असा प्रश्न सुरुवातीला मुंग्यांना पडला. पण ती कशी दूर पूर्वेतून परत आली आहे, आणि तेही केवळ प्राणिमात्रांचा विकास होऊन त्यांना तिला मिळाला तसा सदैव आनंद मिळावा म्हणून, हे तिच्याबरोबरच्या वरातीने कलकलाट करून मुंग्यांना पटवले.

लाल मुंग्या मात्र त्याला अपवाद ठरल्या. एका ओंबिलाच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी आपला वेगळा गट उभारला. काककन्या पपांकडे गेली. पपांनी आनंदला बोलावले. आनंद वदला, "त्येंच्याकडं लक्श दिऊ नगासा. कोकनातले हाईत त्ये. लई तिरकं डोस्कं. साठा जमिवनार चवलीचा, आनी कुनी चोच घालाया गेलं डसनार रुपयाचं. त्येंस्नी बसू द्या 'नारायन नारायन' करीत.  घाटावरच्या काळ्या मुंग्या मातर आपल्या. येकदा बात पटली की मुकाट हिरीतपन उडी मारत्यात. "

'बचतगट' हे नाव आडनिडे वाटत असूनही मुंग्यांनी ते स्वीकारले. आणि गाढवांच्या तन्मयतेने बचतगटांच्या तिजोऱ्या भरायला सुरुवात केली. काककन्येने त्या बचतगटांच्या पदाधिकारीपदी तिच्या काकसख्या असतील एवढे आवर्जून पाहिले.

पावसाळा येण्याआधी सगळ्या बचतगटांचा एकत्रित साठा तिने स्वतःच्या देखरेखीखाली एका मोठ्या बिळात हलवला, ज्याचा पत्ता कुठल्याही मुंगीला नव्हता.

पावसाळा आला. आणि जोरात आला. दिवस दिवस झड निमेना. स्वतःच्या वजनाच्या दसपट वजन एकावेळेला उचलणाऱ्या मुंग्याही मेटाकुटीला आल्या. आपल्या बचतगटांमध्ये साठवलेले आपलेच धान्य मिळावे म्हणून त्या आपापल्या कोठारांकडे गेल्या, पण तिथे सगळेच ओसाड बघून त्यांचा धीर सुटला. आता काककन्येला कुठे शोधावे म्हणून त्यांनी विचारविनिमय सुरू केला. पण पावसाचा प्रलय सुरूच राहिला, आणि त्यांचा विचारविनिमय पूर्ण होण्याच्या आतच त्या सगळ्या बिचाऱ्या बुडून मेल्या.

कावळ्यांनी मात्र त्या पावसाळ्यात गहू-जोंधळे-भात यावर मजेत निर्वाह केला.

तात्पर्यः बचत करणे महत्त्वाचे. पण बचतगट ताब्यात असणे अधिक महत्त्वाचे.