हाव

किती वंचना, किती दुःख अन् घाव किती
तरी फिटेना, जगण्याची ही हाव किती ?

किती सिकंदर भेटत गेले रोज नवे
अजून नशिबी पोरसच्या पाडाव किती ?

जमीन-जुमला, पैसा-अडका अन् जाया
अखेर आम्हा सरड्यांची ती धाव किती ?

चला, करा रे सगळ्या 'इझ्मां'ची होळी
जुने-पुराणे फसलेले प्रस्ताव किती ?

किती शोधले मी जगण्याच्या अर्थाला
तरी न कळले  अज्ञाताचे ठाव किती...