सखे गे, प्रिये ये जवळी,
गत स्मृतींना देत झळाळी !
आपण दोघे जीवनसाथी,
जीवन-वैभव आपुल्या हाती!!
आठवते का जग स्वप्नांचे?
रंग-बिरंगी मस्त मजेचे!
स्वप्नांची ती दुनिया मोठी,
कसे धावलो त्यांच्या पाठी?
स्वप्नांमधूनी होता जागे,
भूवर आलो दोघे आपण!
चुकलो अथवा जरी अडखळलो,
एकामेका पूरक ठरलो!
एकदिलाने लढलो आपण!
सहज जिंकिले ते अवघडपण!
त्या साऱ्यांची होता आठवण,
हसू उमलते आपुल्या आपण!
चाल राहिली अजून पुष्कळ,
तूच पुरविशी जरुर ते बळ!