कोलंबसला देश नसतो

कोलंबसला देश नसतो, कोलंबसचा देश नसतो.

काळोखातच घालून साद, अंधारातच टाकतो पाउल

पुढच्या पावलाखाली काय? दिशा नसते नसते चाहूल

दाहीदिशा धूसर तरी, पायात असते आतले बळ

मनगट मेंदू एकवटलेले, सांगत असतात वाट उजळ

किती तडाखे कितिक घाव, सोसत शोधतो आपला ठाव

इतिहासाच्या पानावरती, कोरून ठेवतो आपले नाव

ऊन वारा पाउस वादळ हेच त्याचे सखे सोबती

यांच्या संगे झुंजत झुंजत, चालत राहणे हीच नीती

होतेच होते पहाट, भेटतात ,पायांनाही अवघड घाट

शोधणाराचे काळीज म्हणते, तरीही शोधून काढीन वाट

देश नसतो कोलंबसला, म्हणून जग त्याचे होते

आपल्या मधल्या कोलंबसला, जागवेल त्याचे जग असते.