प्रश्न हेच माझे जीवन
मी तसा नियमित येत असतो, या घाटावर! सायंकाळी!
नदीकिनारी एकांतात बसायला मला आवडत.
म्हटलं तर आजूबाजूला अनेक असतात. अगदी ओळखीचे सुद्धा!
मी मात्र असतो अगदी एकटा!
ढगांचे अनोखे रंग न्याहाळणं हा माझा छंद!
नुसतेच रंग नव्हेत, तर त्यांची रुपे सुद्धा!
ढगांचे आकार कधी असतात अश्वासक, प्रेरक
तर कधी धमकावणारे भयावह!
जगाच्या एकूणच व्यवहारांचं प्रतिबिंब मला ढगात दिसत राहतं.
या ढगाकडे पाहाताना मी हरवून जातो, विचारांच्या गर्दीत.
सारंच अनोळखी होऊन जातं.
मी मलाच ओळखत नाही.
कोण मी? काय काम माझं या जगात?
का जगतो मी? मरण येत नाही म्हणून?
केवळ अपघातानं?
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!
प्रश्नांचे फेर नाचू लागतात, आवती भवती.
उत्तरांच जंजाळ हाती गवसतच नाही.
एव्हाना झालेली असते रात्र.
पसरलेला असतो काळोख!
प्रश्नांना उत्तर मिळालेलं असतं काळोखाचंच!
हे रोजच घडतं, नित्य घडतं!
प्रश्न हेच माझ जीवन आहे!
उत्तर हा अंत असेल बहुदा!