चालू क्षणावर, अधिकार माझा,
पुढीलाचा भरोसा, कोणी द्यावा?
मनुष्ये योजावे, दैवे उधळावे,
नित्य अनुभव, ठायी-ठायी!
निसर्ग सांगतो, मनुष्य मर्यादा
मानवास मात्र, मान्य नाही!
झगडा आमुचा, साऱ्या शक्तिनिशी
विजयाचे झेंडे, जागोजागी!
क्षमता अपुऱ्या, दैव प्रतिकूल,
मानवी विकास, बुद्धिबळे !
'असाध्य ते साध्य, करिता सायास',
मंत्र जागविला मानवाने!
निरखला निसर्ग, पारखला पूरा!
अभ्यासले निष्कर्ष, पुन्हा पुन्हा!
जाणोनी नियम, योजियली युक्ती,
मिळवली शक्ती, अपारशी!
पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ अनुभव,
नद्यांची निर्मिती, धरणाद्वारे!
पक्षांचे ते पंख, मानवास कोठे?
तरी आकाश ठेंगणे, केले त्याने!
गगन भरारी, सागर धुंडाळी,
नवलाई आता, उरली नाही!
शेतीचे उत्पन्न, कितीपट वाढे!
रोगावर मात, नित्य साधे!
संगणक किमया, नवी क्रांतिगाथा,
विज्ञान-सरिता, वहाताहे!
यत्नांची देवता, मनुष्ये भजता,
विचारांची शक्ती प्रगटावी!
विचारांना साथ, विवेकाची हवी
मानवी प्रगतीला अंत नाही!