उसवली शिवण जरी येतात घालता टाके ।
शाबूत नाही राहिलेले ते नेढे शिवणसुईचे ॥
सल अंतरीचे निवण्या चार प्रेमशब्द पुरे ।
शब्द-शब्द आता सारे निरस नि उष्टावलेले ॥
दूरचा प्रवास जरी संगतीने होय सोपा ।
कां हट्ट तुझा अडमुठा मावळतीकडेच जाण्याचा ॥
अपुल्या नात्या दिला होता चंद्रचांदण्याचा दाखला ।
कोण निष्ठुर चकोर सारे चांदणेच पिवून गेला ॥
नको आता आढेवेढे विसरून जा सारे तिढे ।
हात हाती गुंफून गाऊं नवनवीन प्रेमतराणे ॥